वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड न झालेल्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे निवडसमितीने नवी जबाबदारी सोपवली आहे. इराणी चषकासाठी रेस्ट ऑफ इंडिया संघाचं नेतृत्व ऋषभकडे सोपवण्यात आलं आहे. ऋषभ संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक भूमिकेत असेल. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या सर्फराझ खानकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऋषभच्या नावाचा विचार होईल अशी चिन्हं होती मात्र सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे निवडसमितीने ध्रुव जुरेलच्या नावाला पसंती दिली. लोकेश राहुल आणि ध्रुव जुरेल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळतील. ऋषभचं भारतीय कसोटी संघातलं स्थान पक्कं आहे. मात्र वनडे आणि टी२० संघात पुनरागमनासाठी त्याला प्रयत्नांची शर्थ करावी लागेल. इशान किशन, ध्रुव जुरेल, संजू सॅमसन हे जबरदस्त फॉर्मात आहेत. याव्यतिरिक्त राहुल फलंदाजीच्या बरोबरीने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत असल्याने संघाला अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज खेळवता येतो.

चांगल्या फॉर्मात असलेला सनत संगवान, दुलीप ट्रॉफी स्पर्धेत शतकी खेळी साकारणारा शिखर मोहन, अनेक वर्ष डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांची टांकसाळ उघडणारा सुदीप घरामी यांच्यासह स्मरन रवीचंद्रन यांच्यावर फलंदाजीची धुरा असेल. मानव सुथार, सारांश जैन, अनुकूल रॉय प्रमुख फिरकीपटू असतील. आकाश दीपचा या संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याचा सहभाग फिटनेस संदर्भात मंजुरीवर अवलंबून असेल. त्याच्या जोडीला मुकेश कुमार, मुकेश चौधरी असतील. आर्यन जुयाल संघातला दुसरा यष्टीरक्षक असेल. आर्यन पांडे आणि आयुष दोसेजा यांनाही संघात स्थान मिळालं आहे.

इराणी करंडकाचा सामना १ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत श्रीनगर इथे होणार आहे. जम्मू काश्मीरने पहिल्यांदाच रणजी करंडकाच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. काश्मीरने जेतेपद पटकावल्यामुळे इराणी चषकाच्या आयोजनाचा मान त्यांना मिळाला आहे. रेस्ट ऑफ इंडिया संघातील खेळाडूंसाठी श्रीनगर इथे खेळणे हा सर्वस्वी नवा अनुभव असणार आहे.