Rishabh Pant World Record IND vs SL Galle Test: भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. जगातील अनेक बड्या बड्या क्रिकेटपटूंना मागे टाकत विश्वविक्रम रचला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ऋषभ पंतने हा विक्रम केला. ऋषभ पंतने आपलं अर्धशतकदेखील पूर्ण केलं.
नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केल्याच्या दिवसापासून बरोबर आठ वर्षांनी ऋषभ पंतने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी २८ वर्षीय पंतने दुसऱ्या डावात आपला १००वा कसोटी षटकार लगावला. पहिल्या डावात ३९ धावांची खेळी करताना पंतने एक षटकार मारला होता. दुसऱ्या डावात त्याने लाहिरू कुमारा टाकत असलेल्या डावातील १४व्या चेंडूवर लॉन्ग-ऑफच्या दिशेने गगनचुंबी षटकार ठोकला. हा चेंडू मैदानाबाहेर गेल्याने अंपायरना चेंडू बदलावा लागला. यानंतर कुमाराच्याच गोलंदाजीवर पंतने फाइन लेगच्या दिशेने हुक करत षटकार ठोकला आणि अवघ्या ५३ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. हा त्याचा कसोटी क्रिकेटमधील १००वा षटकार ठरला.
ऋषभ पंतने दुसऱ्या डावात दोन षटकार लगावले. पंतचा पहिला षटकार हा कसोटीतील त्याचा ९९ वा षटकार होता. त्यानंतर दुसरा षटकार लगावताच त्याने १०० षटकार पूर्ण केले. यासह सर्वात कमी डावांमध्ये कसोटीत १०० षटकार पूर्ण करणारा ऋषभ पंत हा जगातील पहिला फलंदाज ठरला. पंतने फक्त ८९ डावांमध्ये १०० षटकार पूर्ण केले. तर सर्वात कमी चेंडूंमध्येही १०० षटकार लगावणारा पंत पहिला फलंदाज ठरला. पंतने ४९१८ चेंडूंत १०० षटकार खेचले आहेत.
कसोटीत सर्वात कमी डावांमध्ये १०० षटकार लगावणारे फलंदाज
- ऋषभ पंत – ८९ डाव
- अॅडम गिलक्रिस्ट – १३० डाव
- बेन स्टोक्स – १५१ डाव
- ब्रेंडन मॅक्युलम – १७० डाव
कसोटीत सर्वात कमी चेंडूंचा सामना करत १०० षटकार लगावणारे फलंदाज
- ४,९१८ चेंडू – ऋषभ पंत (भारत)
- ६,५७८ चेंडू – अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)
- ९,०४२ चेंडू – बेन स्टोक्स (इंग्लंड)
- ९,७५६ चेंडू – ब्रेंडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड)
ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करणारा चौथा फलंदाज ठरला. त्याच्याआधी अॅडम गिलख्रिस्ट, ब्रेंडन मॅक्क्युलम आणि बेन स्टोक्स यांनी हा पराक्रम केला आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला बेन स्टोक्स १३८ षटकारांसह कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. पण या सगळ्यांमध्ये सर्वात जलद १०० षटकार लगावण्याचा विक्रम ऋषभ पंतने केला आहे.
