यंदाच्या हंगामात झंझावाती फॉर्मात असणाऱ्या पंजाब किंग्जचा विजयरथ राजस्थान रॉयल्सने मंगळवारी रोखला. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी रचलेल्या पायावर डोनाव्हन फरेरा आणि शुभम दुबे यांनी कळस चढवला. पण राजस्थानच्या विजयापेक्षा चर्चा रंगली ती कर्णधार रियान परागच्या वर्तनाची. सामन्यादरम्यान रियान ड्रेसिंगरुममध्ये बसून ई सिगारेट पीत असल्याचं दृश्य कॅमेऱ्यानं टिपलं. नियमांनुसार मैदान परिसरात ध्रूमपान करण्यास सक्त मनाई आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा होऊ शकते. खुद्द कर्णधारानेच नियम मोडल्या असल्याने शिक्षेत भर पडली आहे. २४वर्षीय परागचा राजस्थानचा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीत आहे मात्र या प्रकरणामुळे संघातलं वातावरण बिघडू शकतं. रियान परागला वाद नवीन नाहीत. आठवा हंगाम खेळत असलेल्या रियानकडे यंदा राजस्थानची धुरा देण्यात आली.
आयपीएलच्या ९३ सामन्यात रियानच्या नावावर १६८३ धावा आहेत. त्याचा स्ट्राईकरेट १४०चा असून त्याच्या नावावर ७ अर्धशतकं आहेत. २०२४ हंगामात रियानने दमदार खेळ करत ५७३ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षी त्याने ३९३ धावा केल्या. रियानने एक वनडे आणि ९ टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. मैदानावर खेळाइतकंच वादविवाद आणि विविध प्रसंगांमुळे रियान सातत्याने चर्चेत असतो. त्याचाच घेतलेला आढावा.
वर्ल्डकपसाठी निवड नाही, मी सामने पाहणार नाही
मी टी२० वर्ल्डकप पाहत नाही कारण माझी निवड झालेली नाही. या रियानच्या वक्तव्यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने म्हटलं की, काही तरुण मुलं वर्ल्डकप पाहणार नाही असं म्हणत आहेत. कारण हे देत आहेत की त्यांची निवड झालेली नाही. तुमच्यापेक्षा देश मोठा आहे. आधी देशाप्रति आदर सन्मान ठेवायला शिका. सच्चे देशभक्त व्हा. क्रिकेटपटू वगैरे गोष्टी नंतर येतात.
लोक स्विचप्रमाणे बदलतात
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना रियान पराग म्हणाला, “मला मोठे होताना नेहमी वाटायचे की आपल्या भागातील लोक मोठे स्वप्न पाहण्यापासून थांबवतात. मला आता ते बदलायचे आहे. मी अद्याप (आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या) पातळीपर्यंत पोहोचलो नाही. मला देशासाठी खेळायचे आहे. एकदा मी देशासाठी खेळायला लागल्यावर लोकांना कळेल की त्यांच्याकडे एक मार्ग आहे. मी आयपीएलमध्ये खेळलो आहे आणि लोकांना हे समजले आहे की तुम्ही आसामसारख्या लहान राज्यातून असलात तरीही त्या पातळीपर्यंत पोहोचू शकता.”
आयपीएल इतके मोठे लक्ष्य नाही
तो पुढे म्हणाला, “परंतु आयपीएल इतके मोठे लक्ष्य असू शकत नाही. तुम्ही एक वर्ष खेळू शकता आणि नंतर गायब होऊ शकता. पण जेव्हा मी देशासाठी खेळेल, मला वाटते की खरा रोडमॅप तेव्हाच निश्चित होईल. त्यांना प्रत्यक्षात त्याचे पालन करण्याची गरज नाही. ते यासाठी स्वतःचा मार्ग तयार करू शकतात.” परागला त्याच्या कामगिरीसाठी आणि आयपीएल २०२४ च्या आधीच्या हंगामात मैदानाबाहेरील काही टिप्पण्यांमुळे खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
पराग म्हणाला, “हे सोपे नाही. गेल्या वर्षभरानंतर मी स्वतःशी बोललो. या प्रकारचे पुनरागमन वैयक्तिक आहे. कारण मला अशा गोष्टी सहन कराव्या लागल्या, ज्याच्यासाठी मी खरोखरच पात्र नव्हतो. कदाचित माझ्या तयारीत काही गोष्टींची कमतरता असेल, पण तरीही मला असे वाटते की मला इतक्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागायला नको होता. पण मी काय करू शकतो? लोक पर्वा न करता काही ना काही बोलत राहतील. गेल्या वर्षी तो म्हणाला की मी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पुरेसा चांगला नाही. असेल लोकाना वाटत होते. आता त्यांना मी भारतीय संघात हवा आहे. त्यामुळे लोक अगदी स्विचप्रमाणे बदलतात.”
अंपायरबरोबर वाद
आयपीएल २०२५ स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात रियान परागचा अंपायरसोबत वाद झाला होता. राजस्थानला २१८ धावांचा पाठलाग करायचा होता. त्यावेळी राजस्थानचे १२ धावांवर २ फलंदाज माघारी परतले होते. या सामन्यात गोलंदाजाने टाकलेला चेंडू रियानच्या बॅटला लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला होता. त्यावेळी पंचांनी बाद घोषित केलं. रियानने लगेचच डीआरएसची मागणी केली. डीआरएसमध्येही स्पाईक झाल्याचं दिसून आलं. पण रियान पराग या निर्णयावरून नाराज होता. त्याच्या म्हणण्यानुसार,चेंडू बॅटच्या जवळ आला, त्यावेळी बॅट जमिनिला लागल्याने आवाज झाला होता. मैदानाबाहेर जाण्यापू्वी त्याचा आणि अंपायरचा चांगलाच वाद रंगला.
चाहत्याचा मोबाईल फेकला
आपला आवडता क्रिकेटपटू दिसला की, क्रिकेट चाहते फोटो घेण्यासाठी किंवा ऑटोग्राफ घेण्यासाठी धावतात. दरम्यान आयपीएल २०२५ स्पर्धा सुरू असताना, ग्राऊंड स्टाफमधील सदस्यांनी रियान परागकडे सेल्फी घेण्याची मागणी केली होती. त्याने सेल्फी दिला, पण त्यानंतर त्याने फोन फेकून दिला. हा वाद देखील तुफान चर्चेत राहिला होता.
अनन्या पांडे हॉट सर्च करताना दिसला
आयपीएल २०२४ स्पर्धेदरम्यान रियान परागचा आणखी एक वाद तुफान गाजला होता. तो म्हणजे त्याचा यूट्यूब सर्च हिस्ट्रीचा वाद. तो आपल्या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह स्ट्रिमिंग करत होता. त्यावेळी त्याने कॅमेरा आपल्या स्क्रिनकडे वळवला. त्यावेळी त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये असं काही लिहिलं होतं,जे तुफान चर्चेत राहिलं. त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये अनन्या पांडे हॉट आणि सारा अली खान हॉट असे शब्द सर्च केले गेलेले होते. ही बाब त्याच्या लक्षात येताच त्याने तातडीने लाईव्ह स्ट्रिम बंद केलं. पण स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
गेमिंग सत्रादरम्यान यूट्यूबवर लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू केलं. यावेळी तो यूट्यूबवर कॉपी राईट फ्री म्युझिक सर्च करत होता आणि तेव्हा त्याची सर्च हिस्ट्री दिसू लागली. रियान गाणे सर्च करताना त्याची स्क्रिन सुरू होतीच. परागने आधी सर्च केलेले काही कीवर्ड दिसू लागले. यामध्ये सारा अली खान हॉट, अनन्या पांडे सारखे कीवर्ड होते. परागशी संबंधित हा स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
मीच बेस्ट, दुसरं कोणी नाही
रियान परागने २०२३ मध्ये झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला होता. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने सलग ७ अर्धशतकं झळकावली होती. असा पराक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला होता. दरम्यान ७ वे अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने वादग्रस्त सेलिब्रेशन केलं होतं. त्याने इशारा करत, मीच इथे बेस्ट आहे,माझ्यासारखं कोणीच नाही. असं म्हटलं होतं. यावरूनही त्याला प्रचंड ट्रोल केलं होतं.
अशा टॅलेंटचा काय उपयोग?
सनरायझर्स विरुद्धच्या लढतीत रियानच्या बेजबाबदार फटक्यामुळे संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्या फटक्यावर लिटील मास्टर सुनील गावस्कर संतापले. सिरियसली… हा कसला शॉट होता? जर तुम्ही विचारपूर्वक शॉट सिलेक्शन करत नसाल, तर अशा टॅलेंटचा उपयोग काय? तुमच्यात खूप टॅलेंट आहे. हे मान्य पण सोबत संयम नसेल तर काही उपयोग नाही. डॉट बॉलच्या दबावाखाली असे फटके खेळून विकेट गमावणे योग्य नाही. डॉट बॉल्स पुढे जाऊन भरुन काढता आले असते.”
राजस्थान रॉयल्सला क्वालिफायर २ मध्ये सनरायझर्स हैदराबादक़ून १७६ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नियमित अंतराने विकेट पडत राहिल्याने सुरुवातीला गती मिळू शकली नाही. पहिल्या १० षटकात ३ गडी गमावून ७३ धावा केल्यानंतर राजस्थानने ११ व्या षटकात ६ धावा केल्या. यावेळी शेवटचा चौकार येऊन बराच वेळ झाला होता आणि त्याचे दडपण रियान परागवर दिसत होते. याच दडपणाखाली रियान परागने चूक केली आणि १२व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डीप मिडविकेटवर उभा असलेल्या अभिषेक शर्माच्या हाती झेल देत तो बाद झाला.
विजयानंतर केला होता बिहू डान्स
राहुल तेवतिया (नाबाद ४५ धावा) पुन्हा एकदा तारणहार ठरल्यामुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएल हंगामात सनरायजर्स हैदराबादवर पाच गडी राखून विजय मिळवता आला. तेवतिया आणि रियान परागने (२६ चेंडूत नाबाद ४२ धावा) यांनी नाबाद ८५ धावांची भागीदारी करत राजस्थानच्या विजयात मोलाची भर घातली. रियाननेच विजयी षटकार लगावात संघाचा विजय निश्चित केला. या षटकारानंतर परागने आपल्या संघ सहकाऱ्यांकडे पाहून खास नृत्यू करत आनंद साजरा केला. मात्र परागने केलेले हे नृत्य नक्की काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता.
“मला अशा परिस्थितीमध्ये चांगला खेळ करताना आनंद होतो. जेव्हा संघाला माझी गरज असते तेव्हा मला चांगला खेळ करता येतो याचा आनंद आहे. तो बिहू डान्स होता. तो आसामचे पारंपारिक नृत्य आहे. आमच्या संघात काही आसाममधील खेळाडू आहेत. त्यामुळे विजयानंतर आम्ही असाच काही आनंद साजरा केला,” असं सांगितलं.
चाहता पडला पाया
आयपीएल २०२५ मधील पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या राजस्थान रॉयल्सला सलग दुसऱ्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सवर केकेआरने ८ विकेट्सने विजय मिळवला. गुवाहाटीचं बारसपारा स्टेडियम हे रियान परागचं घरचं मैदान आहे, जिथे तो लहानपणापासून क्रिकेट खेळला आहे. या सामन्यादरम्यान एक चाहता सुरक्षेचा घेरा तोडून रियानला भेटायला मैदानात घुसला आणि थेट त्याच्या पाया पडला. रियान पराग डावातील १२वे षटक टाकण्यासाठी आला होता. रियानने याआधीची ३ षटकं खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि केकेआरच्या धावांना ब्रेक लावला होता. रियान पहिला चेंडू टाकणारच होता तेव्हा एक चाहता त्याच्याकडे धावत आला. यानंतर रियानने विचारलं काय झालं आणि मागे पाहिलं तर चाहता मैदानात घुसला होता. चाहत्याने आधी रियानच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर मिठी मारली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिथे पोहोचून त्या चाहत्याला बाहेर नेले.
रियानच्या डोळ्यात अश्रू
गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्स संघाला सलग पाचव्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्या सामन्यानंतर रियान परागच्या डोळ्यात अश्रू तरळले. संजू सॅमसन तेव्हा राजस्थानचा कर्णधार होता. मात्र दुखापतीमुळे तो खेळत नव्हता. रियानकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. पाचव्या पराभवानंतर रियानचा बांध फुटला. संघातल्या सहकाऱ्यांनी त्याचं सांत्वन केलं.
