Riyan Parag Vaping In RR vs PBKS Live Match Video: राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्या सामन्यातील एका धक्कादायक व्हीडिओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग सामना मैदानावर सुरू असताना ड्रेसिंग रूममध्ये बसून ई-सिगारेट पिताना दिसत आहे. त्याचा हा धक्कादायक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हीडिओनंतर रियानला सोशल मीडियावर तुफान ट्रोल केलं जात आहे.
राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्स संघाचा ६ विकेट्सने पराभव करत त्यांचा विजयी रथ रोखला आहे. पंजाब किंग्सचा हा यंदाच्या स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २२३ धावांचा डोंगर उभारला. तर प्रत्युत्तरात राजस्थानच्या सर्वच फलंदाजांच्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या बळावर संघाने १९.३ षटकांत २२८ धावा करत हा विजय मिळवला. पण या विजयानंतर राजस्थान रॉयल्स संघाला रियान परागच्या व्हीडिओमुळे चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
रियान परागचा ड्रेसिंग रूममध्ये व्हेपिंग करतानाचा VIDEO व्हायरल
राजस्थान रॉयल्सचा संघ लक्ष्याचा पाठलाग करत असताना हा प्रकार घडला. १६व्या षटकादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये बसलेला रियान पराग ई-सिगारेट ओढत धूर सोडताना दिसला. हा संपूर्ण प्रकार कॅमेरामध्ये स्पष्ट दिसत आहे. यावेळेस यशस्वी जैस्वाल व ध्रुव जुरेल हे त्याचे संघातील खेळाडूदेखील तिथेच उपस्थित होते. या घटनेमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, कारण भारतात व्हेपिंग ना कायदेशीर आहे ना त्यावर कोणतेही नियमन आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.
भारतात ई-सिगारेट-व्हेपिंगवर बंदी, रियान परागवर बंदी घालणार?
ड्रेसिंग रूम आणि स्टेडियम परिसरात (काही जागा वगळल्यास) अशा गोष्टींवर पूर्णपणे बंदी असते. त्यामुळे परागकडे ई-सिगारेट/व्हेप दिसल्याची बाब धक्कादायक मानली जात आहे. भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा, २०१९ (PECA) अंतर्गत ई-सिगारेट आणि व्हेपवर बंदी घालण्यात आली आहे. या कायद्यानुसार ई-सिगारेटचे उत्पादन, विक्री, खरेदी, आयात-निर्यात आणि जाहिरात करण्यास मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो.
अशा घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या एका उद्योगातील सूत्राने सांगितलं, “सिगारेट ओढण्यापेक्षा व्हेपिंगमुळे नेमकं काय शरीरात जातं, हे स्पष्ट नसतं. म्हणूनच देशात यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यातील घटक काय आहेत, ते सुरक्षिततेच्या निकषांनुसार आहेत की नाहीत, याबद्दलही अनिश्चितता असते, विशेषतः एखाद्या व्यावसायिक खेळाडूसाठी ही बाब अधिक गंभीर ठरते. फ्रँचायझी आणि कर्णधाराला याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागेल, कारण अशा प्रकारच्या प्रकरणात बीसीसीआय सौम्य भूमिका घेण्याची शक्यता कमी आहे.”
यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी ही पहिलीच वादग्रस्त घटना नाही. यापूर्वी त्यांच्या मॅनेजरने PMOA प्रोटोकॉलचे उल्लंघन करत डगआउटमध्ये मोबाईलचा वापर केला होता. हा प्रकार प्रसारणादरम्यान दिसून आला होता. त्यानंतर सखोल चौकशी करून बीसीसीआयने रोमि भिंदर यांना इशारा देत दंडही ठोठावला होता.
