Riyan Parag on Sanju Samson: आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाला नवा कर्णधार मिळाला आहे. संजू सॅमसनला राजस्थान संघाने लिलावापूर्वी रिलीज केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याला ताफ्यात सामील केलं. यासह यंदा संघाचं नेतृत्त्व रियान पराग करणार आहे. यंदाच्या स्पर्धेत ३० मार्चला राजस्थान पहिला सामना खेळणार आहे. रियान परागने नवा हंगाम सुरू होण्यापूर्वी संघाचा पूर्वीचा कर्णधार संजू सॅमसनविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.
रियान परागने गेल्या हंगामात काही सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व केलं असलं तरी, यावेळी संघाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असेल आणि माजी कर्णधार संजू सॅमसनची जागा घेणं हे त्याच्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे, संजू राजस्थान संघाचा वर्षानुवर्षे सर्वात यशस्वी फलंदाज राहिला आहे. मात्र, संजूची जागा घेणं सोपं नाही हे रायनला देखील समजतं आणि त्याने त्याची तुलना विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशी केली.
गेल्या हंगामापर्यंत राजस्थान रॉयल्सचं नेतृत्त्व करत असलेला संजू सॅमसन, आता धोनीच्या संघात म्हणजेच सएसकेचा भाग असणार आहे. मागील हंगामानंतर त्याच्या संघ सोडण्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या. अखेरीस, राजस्थानने आयपीएल २०२६ लिलावापूर्वी संजू सॅमसन व रवींद्र जडेजा या खेळाडूंना ट्रेड करत मोठे बदल केले. राजस्थानने संजूच्या जागी रियानला कर्णधार म्हणून निवडलं, पण संजूच्या जागी उत्कृष्ट फलंदाज शोधणं राजस्थानसाठी महत्त्वाचं असणार आहे.
रियान पराग संजू सॅमसनविषयी नेमकं काय म्हणाला?
नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेसाठी हजर झालेल्या रियान परागलाही संजूच्या रिप्लेसमेंटसंबंधित प्रश्न विचारण्यात आला. गुरुवार, १९ मार्चला झालेल्या पत्रकार परिषदेत, संजूची जागा घेण्याबद्दल विचारलं असता, कर्णधार पराग म्हणाला, “संजू सॅमसनबद्दल बोलायचं तर, आम्ही त्याच्या जागी दुसऱ्या कोणाला रिप्लेस करण्याचा विचार करत नाहीये. आम्ही त्याच्यासारखीच कौशल्य असलेला खेळाडू शोधू शकतो किंवा त्या स्थानावर फलंदाजी करायला लावू शकतो. पण जसं विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना कोणी पर्यायी खेळाडू नाहीये, तसंच संजू भाईच्या बाबतीतही आहे. त्यालाही कोणी रिप्लेस नाही करू शकत; तो इतका चांगला खेळाडू आहे.”
रियान पराग पुढे म्हणाला, “मग आम्ही काही नवीन करणार आहोत का? तर माझ्या मते आम्हाला प्लॅनिंग नीट करायचं आहे. गेल्यावर्षीही आपण पाहिलं असेल की ५ ते ६ सामने असे होते की जे आम्ही अखेरच्या षटकात गमावले किंवा २-३ सामने तर आम्ही शेवटच्या चेंडूवर गमावले. जर आम्ही ते सामने गमावले नसते तर आज हा प्रश्न विचारला गेला नसता. टी-२० क्रिकेटमध्ये ३-४ ठिकाणी असे क्रंच निर्णय घ्यायचे आहेत, कारण सामनाही कधीही पालटू शकतो.”
संजू सॅमसन हा राजस्थानच्या सर्वात यशस्वी कर्णधार आणि फलंदाजांपैकी एक होता. त्याने ११ हंगामांमध्ये राजस्थानकडून खेळताना जवळपास १५० सामन्यांमध्ये ४,००० हून अधिक धावा केल्या. संजू राजस्थानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे.
