IPL 2026 Riyan Parag on Jofra Archer Inside Story: राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला पराभूत करून आयपीएल २०२६ मध्ये आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थानने गुजरातवर अवघ्या सहा धावांनी विजय मिळवला. राजस्थानने दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना, गुजरातचा संघ २०४ धावा करू शकला. २०व्या षटकापूर्वी एका निर्णयाने १९व्या षटकातच सामना पालटला होता. याचं श्रेय रियान परागने ध्रुव जुरेलला दिलं आहे.
राजस्थान रॉयल्सकडून या सामन्यात २११ धावांचं लक्ष्य उभारण्यात यशस्वी जैस्वाल व ध्रुव जुरेल यांनी मोठी भूमिका बजावली. यशस्वी जैस्वालने ५५ धावा तर ध्रुव जुरेलने ७५ धावांची खळी केली. याशिवाय गोलंदाजीत इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर आलेल्या रवी बिश्नोईने ४ विकेट्स घेत राजस्थानला सामन्यात कायम ठेवलं आणि गुजरातला विजयापासून दूर नेलं.
१९व्या षटकात जोफ्रा आर्चरला गोलंदाजीला आणण्याचा निर्णय कोणाचा होता?
राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर रियान परागने खुलासा केला की, सामना फिरवणारा निर्णय घेण्यात यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने महत्त्वाची भूमिका बजावली. रियान परागने सांगितलं की, जुरेलने त्याला १९ व्या षटकात आर्चरला गोलंदाजीसाठी आणायला सांगितले होतं. पराग म्हणाला की, “मी खरं तर गोलंदाजीचा क्रम बदलणार होतो, पण जुरेलने मला १९ व्या षटकासाठी जोफ्राला गोलंदाजीला पाठवायला सांगितलं. (शेवटच्या दोन षटकांसाठी) मला शक्य तितकी वेगवान आणि योग्य लेंग्थवर गोलंदाजी हवी होती.”
याबाबत जोफ्रा आर्चर म्हणाला, “रियानने आपला विचार बदलला होता. रियान स्वत: १९वं षटक टाकणार होता आणि मी अखेरचं षटक टाकणार होतो. सराव आणि सामने या दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात. परिस्थितीशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. स्लोअर बॉल खेळपट्टीवर थांबत नव्हते, त्यामुळे आम्हाला बहुतेक वेगवान चेंडू टाकावे लागले.”
खरं तर, गुजरातला शेवटच्या दोन षटकांत विजयासाठी १५ धावांची गरज होती. रशीद खान आणि कागिसो रबाडा खेळपट्टीवर होते. दोन षटकार-चौकार सुद्धा राजस्थानला पराभूत करण्यासाठी पुरेसे होते. १९व्या षटकात परागने आर्चरला गोलंदाजीसाठी आणलं आणि याच षटकाने सामन्याचं पारडं राजस्थानच्या बाजूने फिरवलं.
आर्चरने आपल्या १९व्या षटकात केवळ चार धावा दिल्या, त्यामुळे गुजरातसमोर विजयासाठी सहा चेंडूंमध्ये ११ धावांचं लक्ष्य राहिलं. तुषार देशपांडेनेही शेवटच्या षटकात केवळ चार धावा दिल्या. त्याने वाईड चेंडूने सुरुवात केली, पण नंतर आपली लय कायम ठेवली आणि यॉर्कर व फुल बॉल टाकून सामना संपवला.
