Riyan Parag Fined By BCCI: राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान परागवर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी लाईव्ह सामन्यादरम्यान, रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढताना दिसून आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत राहिला. हे नियमांच्या विरूद्ध आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार हे निश्चित होतं. अखेर आयपीएलकडून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये अतिशय अटीतटीचा सामना रंगला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवर विजय मिळवला. दरम्यान सामना सुरू असतानाच जेव्हा कॅमेरामनने कॅमेरा ड्रेसिंग रुमकडे वळवला, त्यावेळी ये दिसलं ते सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं होतं. ड्रेसिंग रुममध्ये बसून रियान पराग ई-सिगारेट ओढताना दिसून आला. बीसीसीआयकडून या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यात आली असून, रियान परागवर मॅच फी च्या २५ टक्के दंड आकारण्यात आला आहे.

यासह आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्ट लेव्हल १ चे उल्लंघन केल्यामुळे त्याला १ डिमेरिट पॉईंट देखील देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रियान पराग आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२१ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळून आला आहे. हा नियम खेळाची बदनामी किंवा गैरवर्तणूक करण्याशी संबंधित आहे. भारतात ई-सिगारेटवर बंदी आहे. असं असतानाही रियान पराग सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये बसून असे कृत्य करत असेल. तर हे चुकीचं आहे. अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

रियान परागला किती दंड भरावा लागणार?

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान परागला राजस्थान रॉयल्सने या हंगामासाठी १४ कोटींमध्ये करारबद्ध केले आहे. त्यानुसार त्याची मॅच फी पाहिली, तर प्रत्येक सामन्यासाठी त्याला १ कोटी रुपये मिळतात. या मॅच फी वर २५ टक्के दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावर २५ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. आयपीएलकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. यामागचं कारण म्हणजे, इतर कोणीही असं काही करण्याचा विचारही केला नाही पाहिजे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. राजस्थानने आतापर्यंत ९ सामने खेळले असून, त्यापैकी ६ सामने जिंकले आहेत. १२ गुणांसह हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.