Riyan Parag, Rajasthan Royals Captain: आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरूवात होण्याआधी राजस्थान रॉयल्स संघाने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. युवा फलंदाज रियान परागकडे राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. पण आयपीएल २०२६ स्पर्धेआधी संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्ज संघात प्रवेश केला आहे. तर संजूच्या मोबदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थान रॉयल्स संघात स्थान देण्यात आलं आहे.

राजस्थान रॉयल्सने स्पर्धेतील पहिल्याच हंगामात जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यानंतर राजस्थानने अंतिम फेरीत प्रवेश केला, पण जेतेपदाची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. संजू सॅमसननने संघाची साथ सोडल्यानंतर कर्णधारपदाची जागा रिकामी होती. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, ही जागा भरून काढण्यासाठी २४ वर्षीय रियान परागची निवड करण्यात आली आहे. रियान परागकडे राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. गेल्या हंगामात कर्णधार संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाल्यानंतर नेतृत्वाची जबाबदारी रियान परागकडे सोपवण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना राजस्थानने ८ पैकी २ सामने जिंकले होते. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने ३८.५८ च्या सरासरीने धावा केल्या होत्या. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध केलेली ९५ धावांची खेळी, ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली होती.

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक कुमार संगकाराने कर्णधारापदासाठी काही खेळाडूंची मुलाखत घेतली होती. ज्यात रियान परागचा देखील समावेश होता. गेल्या हंगामात राहुल द्रविड हे राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. पण ही स्पर्धा झाल्यानंतर त्यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता कुमार संगकाराची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघ हवी तशी कामगिरी करू शकला नव्हता. १४ पैकी केवळ ४ सामन्यांमध्ये राजस्थानला विजय मिळवता आला होता. तर १० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

मुख्य बाब म्हणजे, संजू सॅमसनचा चेन्नई सुपर किंग्जसोबत ट्रेड झाल्यानंतर, रवींद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आलं होतं. जडेजा हा सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे संजूनंतर कर्णधारपदासाठी रवींद्र जडेजाचं नाव आघाडीवर होतं. पण असं काहीच झालेलं नाही. राजस्थान रॉयल्सने भविष्याचा विचार करून ही जबाबदारी रियान परागकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असावा. आता रियान पराग पूर्णवेळ कर्णधार म्हणून राजस्थानला चॅम्पियन बनवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.