राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील २० मे रोजी झालेल्या सामन्यात रियान परागच्या नेतृत्त्वाखालील संघाने विजय मिळवला. या विजयानंतर संघाचा नियमित कर्णधार रियान पराग मात्र संतापला होता. रियान परागने पत्रकार परिषदेदरम्यान कॉमेंटेटर्सना सुनावलं आहे. त्याच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ७ गडी राखून विजय मिळवल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार परागने वक्तव्य केलं. रियानने आयपीएल २०२६ दरम्यान समालोचकांकडून केल्या जाणाऱ्या ‘वैयक्तिक’ टिप्पणींवर नाराजी व्यक्त केली आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना परागने समालोचकांनी क्रिकेटचा आदर राखावा आणि फक्त खेळावरच बोलावं, असं स्पष्टपणे सांगितलं. त्याच्या या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राजस्थानचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने लखनौविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ३८ चेंडूंमध्ये ९३ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली, ज्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सामन्यानंतर राजस्थान संघाचा कर्णधार म्हणाला की, या हंगामात क्रिकेटपेक्षा मैदानाबाहेरील गोष्टींवर जास्त चर्चा होत आहे. तो म्हणाला की, खेळाडू प्रत्येक सामन्यापूर्वी अनेक दिवस तयारी करतात, पण कोणाचाही दिवस खराब जाऊ शकतो.

अलीकडेच ड्रेसिंग रूममधील व्हेपिंग प्रकरणामुळे रियान पराग सध्या चर्चेत आहे. टीका आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगला तो कसा सामोरा जातो, असे विचारले असता त्याने स्पष्ट उत्तर दिलं. तो म्हणाला की, आता त्याच्या लक्षात आलं आहे की, आपण काहीही केलं तरी लोक बोलणारच, त्यामुळे त्याने बाहेरील गदारोळाकडे दुर्लक्ष करून केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करायला शिकला आहे.

रियान परागने समालोचकांवर टीका करताना म्हटले की, “आम्ही खेळाडू खूप मेहनत करतो आणि प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो, पण जर एखादा संघ ७५-८० धावांत सर्वबाद झाला, तर लगेचच असं म्हटलं जातं की त्यांना खेळता येत नाही किंवा त्यांची मानसिकता खराब आहे. लोकांच्या हे लक्षात येत नाही की सामन्यापूर्वी ते ३-४ दिवस २००-२५० धावांची तयारी करत असतात. लोक फक्त एक सामना पाहतात आणि मग असा निष्कर्ष काढतात की संघाला खेळायचं नाही किंवा त्यांना खेळता येत नाही.”

“पण त्यासाठी अनेक दिवसांची तयारी लागते. खेळाडूंकडूनही चुका होतात आणि त्यांनाही थोडा आदर दिला पाहिजे. समालोचकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचतो, त्यामुळे मला त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की, क्रिकेटवर प्रेम करा आणि क्रिकेटबद्दल बोला. खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणं योग्य नाही. देशातील सर्वात मोठ्या खेळाला थोडा आदर मिळायलाच हवा. फक्त क्रिकेटबद्दल बोला, त्याशिवाय इतर कोणती चर्चा करू नको,” असं रियान पराग पुढे म्हणाला.