Riyan Parag Statement: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ६९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेला हा सामना दोन्ही संघांचा या हंगामातील साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांअखेर २०५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने पूर्ण जोर लावला. पण मुंबईला १७५ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईने हा सामना ३० धावांनी गमावला. या विजयासह राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. पण तरीही रियान पराग नाराज आहे. सामन्यानंतर रियान पराग काय म्हणाला? जाणून घ्या.
सामना झाल्यानंतर बोलताना रियान पराग म्हणाला, “जेव्हा गोष्टी ठरल्याप्रमाणे घडतात, तेव्हा बरं वाटतं. मला माहीत आहे, आम्ही सामना जिंकलो, प्लेऑफसाठी पात्र ठरलो. पण काही गोष्टी अशा आहेत जिथे आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. सेट झालेल्या फलंदाजांनी आणखी काही षटकं फलंदाजी करायला हवी होती.”
या सामन्यात जोफ्रा आर्चर हा रवींद्र जडेजाच्या आधी फलंदाजीला उतरला होता. याबाबत बोलताना रियान पराग म्हणाला, “आम्हाला धावांची गरज होती. ही अशी खेळपट्टी होती जिथे दोन्ही फलंदाजांनी १-१ धावा घेणं ठीक नव्हतं. एक फलंदाज असा हवा होता जो मोठे फटके मारेल. तर दुसरा फलंदाज काही वेळ खेळपट्टीवर टिकू शकतो. जडेजावर माझा विश्वास आहे. तो १० चेंडूत कमीत कमी २० धावा काढून देऊ देऊ शकतो. ते त्याने करून दाखवलं.”
राजस्थानचा दमदार विजय
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम हे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सकडून ध्रुव जुरेलने ३८ धावांची खेळी केली. तर जोफ्रा आर्चरने ३२ धावा केल्या. राजस्थानने पहिल्या डावात ८ गडी बाद २०५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६० धावा केल्या. पण मुंबईचा संघ विजयापासून ३० धावा दूर राहिला.
