Riyan Parag Vaping BCCI Punishment: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग पुन्हा एकदा वादामुळे चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात तो ड्रेसिंग रूममध्ये व्हेपिंग करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना सुरू असताना ड्रेसिंग रूममध्ये रियान पराग बॅन असलेली ई-सिगारेट पितानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामुळे आता नियमांप्रमाणे त्याच्यावर कोणती कारवाई केली जाणार, जाणून घेऊया.
हा प्रसंग मुल्लानपूरमधील पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान राजस्थान संघ २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, डावाच्या १६व्या षटकात प्रसारणादरम्यान कॅमेऱ्यात कैद झाला. चाहत्यांच्या लक्षात येताच हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला.
या घटनेची चर्चा अधिक वाढण्यामागे वेळही महत्त्वाचा आहे. याच हंगामात परागला त्याच्या फलंदाजी आणि कर्णधारपदाबाबत आधीच टीकेला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे या नव्या घटनेमुळे त्याच्यावर अधिक लक्ष केंद्रित झालं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पराग दुसऱ्या डावात राजस्थानच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना व्हेपिंग करत असल्याचं दिसतं. प्रसारणादरम्यान टिपलेली ही दृश्यं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आली.
IPL नियम काय सांगतात?
आयपीएलच्या शिस्तभंग नियमांनुसार, स्टेडियम परिसर आणि ड्रेसिंग रूममध्ये धूम्रपान करण्यास परवानगी नाही, फक्त काही निश्चित केलेल्या जागांमध्येच धुम्रपान करता येतं. याशिवाय, भारतात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा, २०१९ (PECA) अंतर्गत ई-सिगारेट आणि व्हेपवर पूर्ण बंदी आहे. या कायद्यानुसार ई-सिगारेट/व्हेपचे उत्पादन, विक्री, खरेदी, वापर, आयात-निर्यात आणि जाहिरात करण्यास मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये दंड आणि तुरुंगवासाचाही समावेश आहे.
रियान परागवर कठोर कारवाई होणार?
या व्हिडिओबाबत किंवा कोणत्याही गैरवर्तनाबाबत आयपीएलकडून अद्याप अधिकृत भूमिका घेण्यात आलेली नाही. मात्र या घटनेनंतर शिस्तभंग कारवाईबाबत चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही आयपीएलमध्ये ड्रेसिंग रूममधील वर्तनावर कडक नियम लागू करण्यात आले आहेत. राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमि भिंदर यांना याच हंगामात सामन्यादरम्यान डगआउटमध्ये मोबाईल वापरल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता.
अलीकडे मैदानाबाहेरील खेळाडूंचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाजा याचाही एक व्हिडिओ चर्चेत आला होता. प्रत्येक प्रकरण वेगळं असलं तरी नियमभंग झाल्यास लीगने कारवाई करण्याची परंपरा ठेवली आहे. जर या व्हिडिओत आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं आढळलं, तर रियान परागवर दंड किंवा इतर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
मात्र, दोष केवळ रियान परागचाच नाही, तर राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाने रियान परागला व्हेपिंग करण्याची परवानगी कशी दिली? तेही अशा ड्रेसिंग रूममध्ये, जिथे वैभव सूर्यवंशीसारखा १५ वर्षीय खेळाडू आणि या इतर प्रतिभावान तरुण खेळाडूही आहेत. त्यामुळे आता रियान पराग प्रकरणावर बीसीसीआय काय निर्णय घेणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत.
