क्रिकेट जगतातील २०२५ मधील सर्वात मोठी घडामोड म्हणजे रोहित शर्मा व विराट कोहली यांनी अचानक कसोटीतून जाहीर केलेली निवृत्ती. रोहित-विराटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटला अलविदा करत असल्याचं जाहीर केलं आणि सर्वांनाच धक्का बसला. क्रिकेट चाहते व माजी खेळाडू सर्वच जण चकित झाले. इंग्लंड दौऱ्यापूर्वी नेमकं असं काय घडलं की या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी थेट निवृत्तीचा मोठा निर्णय घेतला. आता यावर भारताच्य माजी खेळाडूने मोठा प्रश्न उपस्थि केला आहे.
भारताने इंग्लंड मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्धची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी तब्बल १० वर्षाने गमावली होती. रोहित-विराट हे दोघेही या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरले होते. यादरम्यान रोहित-विराटच्या कसोटी फॉर्मबद्दल चर्चा सुरू होती. पण दोघेही या फॉरमॅटला अलविदा करतील असं कोणाला वाटलं नव्हतं. पण इंग्लंडविरूद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर होण्यापूर्वी रोहित शर्मानंतर विराट कोहलीने देखील कसोटीला अलविदा केलं.
भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर रोहित आणि विराटबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर देताना एक महत्त्वपूर्ण विधान केलं. त्यांने स्पष्ट सांगितलं की रोहित आणि विराटचं कसोटी क्रिकेटमधून अचानक घेतलेली निवृत्ती ही साधारण वाटत नाहीये. रोहित-विराटने खुलासा केल्यास यामागील सत्य कळू शकेल.
रॉबिन उथप्पा म्हणाला, “त्यांना सक्तीने बाजूला व्हा असं सांगण्यात आलं का मला माहिती नाही पण त्या दोघांचा निवृत्तीचा निर्णय स्वाभाविक वाटला नाही. खरं काय आहे, हे ते दोघे स्वतः योग्य वेळी सांगतील. मात्र मला तरी हे सगळं नैसर्गिक वाटत नाही,” असंही तो म्हणाला.
“ऑस्ट्रेलियात रोहितच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, तेव्हा मला वाटलं होतं की त्याने सहा महिन्यांचा ब्रेक घेऊन फिटनेसवर काम करावं. तो पुन्हा धावा करेल, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती.” असं उथप्पाने स्पष्ट केलं.
“विराट आणि रोहित दोघांच्याही डोळ्यांत पुन्हा धावा करण्याची आणि संघाला विजय मिळवून देण्याची तीच भूक दिसते, आणि ते पाहणं खरंच छान वाटतंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडत बरंच काही साध्य केलेल्या अनुभवी खेळाडूंकडून अशी जिद्द पाहणं मनाला भावणारं आहे,” असंही उथप्पाने म्हटलं.
