Robot Breaks Usain Bolt Record: गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. मुख्यत: रोबोट्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इतर क्षेत्रात रोबोट्सचा वापर होणं ही सामान्य बाब आहे. पण आता क्रीडा क्षेत्रातही रोबोट्सची एन्ट्री झाली आहे. रोबोटने असा काही कारनामा करुन दाखवला आहे, जो आजवर कुठल्याही खेळाडूला करता आलेला नाही. सर्वात वेगवान धावपटू म्हणून जमाईकाचा उसेन बोल्ट हा अव्वल स्थानी आहे. सर्वात जलद १०० मीटर शर्यत पूर्ण करण्याचा रेकॉर्ड हा उसेन बोल्टच्या नावे आहे. हा रेकॉर्ड कुठल्याही धावपटूला मोडता आलेला नाही. पण एका रोबोटने हा रेकॉर्ड मोडून काढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उसेन बोल्टचा रेकॉर्ड मोडणारा रोबोट आहे तरी कोण?

सर्वात जलद १०० मीटर पूर्ण करण्याचा रेकॉर्ड हा उसेन बोल्टच्या नावावर आहे. बोल्टने २००९ मध्ये झालेल्या वर्ल्ड अॅथलेटीक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत अवघ्या ९.८ सेंकदात १०० मीटर शर्यत पूर्ण करुन वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. त्यानंतर त्याला जगातील सर्वात वेगवान धावपटू हा टॅग देण्यात आला होता. पण आता १७ वर्षांनंतर एका रोबोटने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. बिजिंगमध्ये झालेल्या एका स्पर्धेत Lighting bolt नावाच्या रोबोटने अवघ्या ९.३९ सेंकदात शर्यत पूर्ण करुन सर्वांना थक्क केलं आहे.

हा रेकॉर्ड एका रोबोटने मोडला आहे, त्यामुळे हा रेकॉर्ड अधिकृतरित्या ग्राह्य धरला जाणार नाही. अजूनही सर्वात जलद १०० मीटर पूर्ण करण्याचा रेकॉर्ड हा बोल्टच्या नावे कायम आहे. मुख्य बाब म्हणजे, ज्यावेळी रोबोटने वेगाने १०० मीटरची शर्यत पूर्ण केली, त्यानंतर तो आपला तोल सावरु शकला नाही. तो समोर जाऊन एका भिंतीला आदळला. त्यामुळे त्याला स्ट्रेचरच्या साहाय्याने बाहेर घेऊन जाण्यात आलं.याउलट जेव्हा बोल्टने हा रेकॉर्ड मोडून काढला होता. त्यावेळी तो जोरदार जल्लोष करताना दिसून आला होता.

केवळ धावण्यात नाही, तर उंचउडीतही रोबोटने दमदार कामगिरी केली. जागेवर उभं राहुन उंच उडी मारण्याच्या प्रकारात रोबोटने २.८८ मीटर उंच उडी मारली. याआधी ह्यूमनाईड रोबोटने ०.९५ मीटर इतकी उडी मारली होती. आता जी उंच उडी मारली आहे, त्यात बराच फरक आहे. २.८८ मीटर उंच उडी ही कुठल्याही खेळाडूने मारलेली सर्वात उंच उडी आहे. याआधी २.४५ मीटरचा रेकॉर्ड क्यूबाच्या जेवियर सोटोमायोरने आपल्या नावावर केला होता.