भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा रुमानियन सहकारी फ्लोरिन मेर्गिआ यांना आपिया आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. अंतिम फेरीत त्यांना ब्रुनो सोरेस (ब्राझील) व जेमी मुरे (इंग्लंड) यांनी ६-३, ७-६ (८-६) असे हरवले. चुरशीने झालेल्या दीड तासाच्या या लढतीत बोपण्णा व मेर्गिया यांना पहिल्या सेटमध्ये दोन ब्रेकपॉइंट्स मिळाले होते, मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. त्यांनी दोन वेळा सव्र्हिसही गमावली. दुसऱ्या सेटमध्ये चांगली झुंज दिली. त्यांनी सात वेळा ब्रेकपॉइंट्स वाचविले. टायब्रेकरमध्ये त्यांच्याकडे ४-० अशी आघाडीही होती. मात्र त्यानंतर त्यांना सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण राखता आले नाही. बोपण्णाने या स्पर्धेत गतवर्षी कॅनडाच्या डॅनियल नेस्टॉरच्या साथीने विजेतेपद मिळवले होते. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत बोपण्णा हा मेर्गिआसोबत सहभागी होणार आहे.