भारताच्या रोहन बोपण्णाने माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या जेतेपदावर कब्जा केला. रोहनने रोमानियाच्या फ्लोरिन मर्गेआच्या साथीने खेळताना नेनाद झिम्नोझिक आणि मार्टिन मॅटकोव्हस्की या अनुभवी जोडीवर ६-२, ६-७ (५), ११-९ अशी मात केली. एक तास आणि २४ मिनिटांच्या संघर्षांनंतर बोपण्णा-मर्गेआ जोडीने हा विजय साकारला. २०१५ वर्षांतले बोपण्णाचे हे तिसरे, तर मर्गेआच्या साथीने खेळताना बोपण्णाचे हे पहिलेच जेतेपद आहे.
पहिल्या सेटमध्ये बोपण्णा-मर्गेआने ४-१ अशी आघाडी घेतली होती. अचूक सव्‍‌र्हिस आणि फटक्यांमध्ये वैविध्य राखत या जोडीने प्रतिस्पध्र्यावर सातत्याने दडपण राखले आणि पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मॅटकोव्हस्की-झिम्नोझिक जोडीने झुंजार खेळ करत बोपण्णा-मर्गेआला निष्प्रभ केले. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही जोडय़ांनी शेरास सव्वाशेर खेळ केला आणि मुकाबला टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये बोपण्णा-मर्गेआ जोडीने ६-१ अशी आघाडी घेतली. मात्र मॅटकोव्हस्की-झिम्नोझिक जोडीने ८-८ अशी बरोबरी केली. ८-९ असे पिछाडीवर असताना बोपण्णा-मर्गेआ जोडीने मॅचपॉइंट वाचवला. यानंतर सलग तीन गुण मिळवत या जोडीने जेतेपद पटकावले.
यंदाच्या हंगामात बोपण्णाने डॅनियल नेस्टरच्या साथीने खेळताना सिडनी आणि दुबई स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. मर्गेआला कसाबलन्का स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र दुसऱ्याच अंतिम स्पर्धेत त्याने जेतेपदाची कमाई केली. जेतेपदासह बोपण्णा-मर्गेआ जोडीने १००० क्रमवारी गुणांची खात्यात भर घातली.