आशियाई क्रीडा स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्यापेक्षा एटीपी टूर पातळीवर क्रमवारीत आगेकूच आणि गुण मिळवण्याला प्राधान्य देण्याचे धोरण रोहन बोपण्णा अवलंबण्याची शक्यता आहे. याआधी सोमदेव देववर्मननेही आशियाई क्रीडा स्पर्धेतून याच कारणास्तव माघार घेतली होती. या दोन अव्वल खेळाडूंनी माघार घेतल्यास आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस संघाचे आव्हान कमकुवत होणार आहे. रोहनने पाकिस्तानच्या ऐसाम उल हक कुरेशीच्या साथीने खेळताना यंदाच्या हंगामात केवळ एकच जेतेपद पटकावले आहे.  ‘‘सोमदेव आणि रोहन हे दोघेही भारतीय संघाचा अविभाज्य घटक आहेत. मात्र या दोघांनी कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून विचार करून आशियाई स्पर्धेतून माघार घेतली तर त्यांना चुकीचे ठरवण्यात येऊ नये,’’ असे प्रशिक्षक आनंद अमृतराज यांनी सांगितले.