Mumbai Indians Special Surprise for Rohit Sharma 15 Years Video: आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला कर्णधार रोहित शर्माला मुंबई इंडियन्सकडून खेळताना १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. रोहित शर्माने आपल्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सला ५ ट्रॉफी जिंकून स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ बनण्यात मोठी भूमिका बजावली. आता रोहित शर्माला मुंबई संघात १५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मुंबई इंडियन्सने हिटमॅनसाठी खास तयारी करण्यात आली होती. ज्याचा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे.

रोहित शर्मा २०११ मध्ये मुंबई इंडियन्स संघात सामील झाला. २०११ ते २०२६ या १५ वर्षांच्या काळात रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा मोठा आधारस्तंभ राहिला आहे. या काळात हिटमॅनने मुंबईसाठी २३० सामने खेळले असून ५,९९४ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने ५ ट्रॉफी जिंकल्या. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये हिटमॅनने आयपीएल ट्रॉफीवर मुंबई इंडियन्सचं नाव कोरलं.

रोहित शर्माला १५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासाठी खास प्लॅन केला होता. रोहितचा मुंबईच्या जर्सीमधील फोटो आणि मुंबईच्या राजाची १५ वर्षे असं लिहिलेला केक तयार करण्यात आला होता. रोहित शर्मा सरप्राईज पाहून हसत हसत ड्रेसिंग रूममध्ये आला.

पोलार्डने यानंतर हिटमॅनची फिरकी घेतली. पोलार्डने एक रिकामी बॉक्स टेबलवर ठेवला आणि म्हणाला, “१५ वर्षे, १५ कोटी या बॉक्समध्ये ठेव आपण सगळे ते पैसे शेअर करू कारण आपण सगळे एक फॅमिली आहोत.” पोलार्डचं बोलणं ऐकून सर्वच जण हसू लागले. हार्दिक पंड्याने रोहित शर्माला खास फोटोफ्रेम दिली. ज्यामध्ये रोहित शर्माचा फोटोवर संपूर्ण मुंबईचं चित्रण रेखाटलं होतं. ही फ्रेम पाहून रोहितच्या चेहऱ्यावर गोड हसू होतं. रोहितने केक कापल्यानंतर हार्दिकने थोडासा त्याच्या गालाला लावला आणि सर्वांनी हिटमॅनची भेट घेत त्याला शुभेच्छा दिल्या.

मुंबई इंडियन्सची ही परंपरा…., रोहित शर्माचं सेलिब्रेशननंतर मोठं वक्तव्य

मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्मासाठी केलेली ही खास तयारी पाहून भावुक झाला होता. यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “खरंतर बऱ्याच जणांचे आभार मानावे लागतील. बरेच खेळाडू जे आता इथे संघाचा भाग नाहीत, त्याशिवाय आकाश अंबानी, निता अंबानीही इथे नाहीत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला कायमच इतका सपोर्ट केला. साहजिकचं त्याचा सपोर्ट, त्यांची साथ महत्त्वाची होती. त्याचबरोबर हा प्रवास ही इतका कमाल करण्यासाठी मी अगदी अंतकरणापासून इथल्या सर्वांचे आभार मानतो. मुंबई इंडियन्सची ही परंपरा अशीच सर्वार्थाने पुढे नेत राहू, पुन्हा एकदा थँक्यू.”

मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२६ मधील पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध होणार आहे. हा सामना रविवारी १२ एप्रिलला मुंबईत वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.