K Srikkanth Apologies To Rohit Sharma: भारतीय संघाने २०११ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना जेतेपदाचा मान पटकावला होता. भारतीय संघ गेल्या २७ वर्षांत एकदाही जेतेपदाचा मान पटकावू शकला नव्हता. अखेर धोनीच्या नेतृत्वात भारताने वानखेडे स्टेडियमवर इतिहास घडवला. या विजयासह भारतीय संघ मायदेशात वनडे वर्ल्डकप ट्रॉफी जिंकणारा पहिलाच संघ ठरला होता. पण हा वर्ल्डकप जिंकण्याआधी निवडकर्त्यांनी काही धक्कादायक निर्णय घेतले होते. ज्यात स्टार फलंदाज रोहित शर्माला वगळण्याच्या निर्णयाचा देखील समावेश होता. रोहितला वनडे वर्ल्डकप स्थान मिळणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात होती, पण शेवटी त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता माजी निवडकर्ते के श्रीकांत यांनी रोहित शर्माची माफी मागितली आहे.
के श्रीकांत यांनी मागितली माफी
रोहित शर्माला संघाबाहेर ठेवल्यामुळे के श्रीकांत यांनी रोहित शर्माची माफी मागितली आहे. के श्रीकांत यांनी द विकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “रोहित बाहेर ठेवण्याच्या निर्णयामुळे मला अजूनही वाईट वाटतं. मी गेल्यावर्षी रोहितला म्हटलं होतं, मला माफ कर, मला माफ कर.. मी हे जाणीवपूर्वक केले नव्हते. आम्हाला फक्त संघात अष्टपैलू खेळाडू हवे होते. आम्ही १९८३ सारखी संघबांधणी करण्याचा विचार केला होता.”
हा निर्णय घेतल्याचा आजही पश्चाताप होतो, हे श्रीकांत यांनी मान्य केलं. श्रीकांत यांना संघात जास्तीत जास्त फलंदाज असावे, जे गोलंदाजी करू शकतात अशी संघबांधणी केली होती. जेणेकरून दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. याचा परिणाम वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दिसून आला होता. रोहित या स्पर्धेतून बाहेर होता. पण त्यानंतर २०१३ मध्ये रोहितने दमदार पुनरागमन केलं. सध्या तो वनडे क्रिकेटमधील नंबर १ फलंदाजांपैकी एक आहे.
वनडे वर्ल्डकप २०११ स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. भारतीय संघाला या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत राहिला होता. हे दोन्ही सामने वगळले, तर भारताने सर्व सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली होती. या स्पर्धेतील क्वार्टरफायनलमध्ये भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर सेमी फायनलमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली होती. शेवटी फायनलमध्ये झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला होता. या सामन्यातील शेवटी एमएस धोनीने षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता.
