रोहित शर्माने आयपीएल २०२६ ची दणक्यात सुरुवात केली आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात हिटमॅनने २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं आहे. रोहित व रिकल्टनने पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी रचली. तर रोहितच्या उत्कृष्ट फटकेबाजीने सर्वांचं लक्ष वेधलं.

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या बॅटने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध उत्कृष्ट खेळी केली. त्याने स्फोटक फलंदाजी करत पॉवरप्लेमध्येच आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ४ गडी गमावून २२० धावा केल्या. २२१ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ‘हिटमॅन’ शर्माने धडाकेबाज सुरुवात केली आणि केकेआरच्या गोलंदाजांची रिकल्टनच्या साथीने धुलाई केली.

रोहितने अवघ्या २३ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केले. त्याने पाच षटकार आणि तीन चौकारांच्या जोरावर आपलं अर्धशतक झळकावलं. २२१ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, डावाची सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माने आपल्या अर्धशतकादरम्यान रोहित शर्माने अनेक मोठे विक्रम मोडले.

रायन रिकेल्टनसोबत डावाची सुरुवात करताना, रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचून मुंबईला दमदार सुरुवात करून दिली. डावाच्या सुरुवातीला रोहित काही चेंडू सावधपणे खेळला, पण तिसऱ्या षटकापासून त्याने फटकेबाजी सुरू केली. तिसऱ्या षटकात आपल्या खेळीतील पहिला षटकार मारल्यानंतर रोहित थांबला नाही आणि पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. रोहितचे २३ चेंडूंतील अर्धशतक हे आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक आहे. यापूर्वी, त्याने आयपीएल २०१५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध २५ चेंडूंमध्ये आपलं सर्वात जलद अर्धशतक झळकावलं होतं.

आयपीएलमधील हे रोहितचं ५० वं अर्धशतक आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. ७२ अर्धशतकांसह विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. डेव्हिड वॉर्नर (६६) आणि शिखर धवन (५३) या यादीतील इतर नावे आहेत. या खेळीदरम्यान रोहितने डेव्हिड वॉर्नरचा एक मोठा विक्रमही मोडला. तो आयपीएलमध्ये केकेआरविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. वॉर्नर १०९३ धावांसह अव्वल स्थानी होता. डावातील आपली ११वी धाव पूर्ण करताच रोहितने वॉर्नरचा विक्रम मोडला. या सामन्यापूर्वी, आयपीएलमध्ये केकेआरविरुद्ध रोहितच्या १०८३ धावा होत्या.