Rohit Sharma Angry on Tilak Varma Wicket Video: मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची अवस्था आरसीबीसमोर फार बिकट झालेली पाहायला मिळाली. स्विंगचा किंग भुवनेश्वर कुमारने मुंबईच्या ४ मोठ्या फलंदाजांना माघारी धाडलं. रायन रिकल्टन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा या फलंदाजांना त्याने माघारी धाडलं. तिलक वर्मा अर्धशतक करत मैदानावर स्थिरावला होता. त्यानंतर तो ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहून रोहित शर्मा त्याच्यावर चांगलाच संतापला.

आरसीबीने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. रायन रिकल्टन पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर रोहित शर्माने दुसऱ्या षटकात १८ धावा कुटत संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण भुवनेश्वरने एका षटकात रोहित व सूर्यकुमारला बाद करत मुंबईला सलग दोन धक्के दिले. यानंतर नमन धीर व तिलक वर्माने संघाचा डाव सावरला. नमन धीर ४७ धावा करत बाद झाला. तर तिलक वर्मा अर्धशतकी खेळी करत मैदानावर कायम होता, पण तो बरोबर १८व्या षटकात भुवीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

भुवनेश्वर कुमारच्या १८व्या षटकात चौकार मारत तिलकने चांगली सुरूवात केली होती. रायपूरच्या खेळपट्टीवर नव्या फलंदाजाला येऊन मोठे फटके येऊन फटकेबाजी करणं अजिबात सोपं नव्हतं. त्यामुळे अखेरच्या २-३ षटकांमध्ये सेट झालेल्या तिलकचं मैदानावर राहणं खूप महत्त्वाचं होतं. पण तिलक भुवनेश्वर कुमारच्या स्पेलच्या अखेरच्या चेंडूवर लॅप शॉट खेळायला गेला.

तिलक वर्मा नेमका कसा बाद झाला?

तिलक गुडघ्यावर बसून विकेटच्या मागे फटका खेळण्यासाठी गेला आणि खेळायला चुकल्याने चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. यासह तिलक वर्मा क्लीन बोल्ड झाला. उत्तम लयीत असलेल्या भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर असा शॉट खेळणं तिलक व मुंबईला महागात पडलं. रोहित शर्माने हा शॉट पाहत निराश होत अरे काय असं म्हणत दीपक चहरकडे पाहिलं आणि त्यानंतर रोहितने रागात शिवीदेखील घातली. तिलकच्या विकेटचं महत्त्व संघाच्या चांगल्या फिनिशच्या दृष्टीने किती महत्त्वाचं होतं, हे रोहितच्या या प्रतिक्रियेतून दिसत होतं.

तिलक वर्माचं अखेरच्या षटकांमध्ये मैदानावर असणं किती महत्त्वाचं होतं, हे दिसून आलं. तिलक वर्मा बाद झाल्यानंतर मुंबईला अखेरच्या षटकांमध्ये एकही बाऊंड्री मारता आली नाही आणि संघ फक्त १६६ धावा करू शकला. यासह मुंबई इंडियन्सने आरसीबीला विजयासाठी १६७ धावांचं आव्हान दिलं आहे.