Rohit Sharma Shouts at Umpire Video: मुंबई इंडियन्सला या स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. वानखेडेच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात आरसीबीने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत २४० धावा केल्या, पण लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला २० षटकांत केवळ २२२ धावाच करता आल्या. दरम्यान मुंबईचा डाव सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा चौथ्या पंचांवर संतापलेला दिसला, ज्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

रोहित शर्माला आरसीबीविरूद्ध सामन्यात दुखापत झाल्याने तो रिटायर्ड हर्ट झाला आणि त्यानंतर तो फलंदाजीला देखील आला नाही. रोहित शर्मा व रायन रिकल्टनच्या जोडीने मुंबई इंडियन्सला २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरूवात करून दिली होती. पॉवरप्लेपर्यंत मुंबईचा संघ ६० धावांच्या जवळ पोहोचला होता. पण तितक्यात रोहित शर्माच्या हॅमस्ट्रिंगमध्ये त्रास होत असल्याने तो रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला.

रोहित शर्मा मैदानात पंचांवर अचानक का संतापला?

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या सामन्यात, रोहित शर्मा रायन रिकल्टनसह डावाची सुरुवात करणार होता आणि त्यासाठी सीमारेषेवर तो सज्ज झाला होता. तितक्यात चौथे पंच त्याची बॅट तपासण्यासाठी आले होते, बॅट तपासण्यासाठीचं ते यंत्र रोहितच्या बॅटला लावण्यात आलं, पण २-३ प्रयत्नानंतरही त्या यंत्रातून बॅट पूर्ण जात नव्हती. रोहित शर्माची ही नेहमीची बॅट असल्याने पंचांच्या यंत्रातून पास होते. पण यावेळेस ३-४ प्रयत्नानंतरही ते यंत्र मध्येच थांबत होतं.

रोहित शर्माच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. हे पाहताच रघू शर्मा लगेच ड्रेसिंग रूममध्ये दुसरी बॅट आणण्यासाठी पळत गेला. रोहित शर्मा सातत्याने पंचांना समजावताना दिसला. त्यानंतर पंचांनी रायन रिकल्टनची बॅट तपासली. तितक्यात रोहितच्या बॅटसोबत होत असलेलं प्रकरण पाहून डगआऊटमधून तिलक वर्मा व सूर्या पुढे आले आणि त्यांनी पंचांचे गेज घेऊन बॅट सहजपणे पास केली. रोहितची बॅट गेजमधून पास होताच, त्याने चौथ्या पंचांकडे रागाने पाहिलं आणि काहीतरी काहीतरी पुटपुटला. त्यानंतर रागाने जळता कटाक्ष टाकत फलंदाजी करण्यासाठी पुन्हा मैदानात परत गेला.

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १९व्या हंगामाची सुरुवात आपला पहिला सामना जिंकून केली, पण त्यानंतर त्यांना सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवाचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या गोलंदाजांची सातत्याने खराब कामगिरी, ज्यांनी आरसीबीविरुद्धच्या सामन्यातही मोठी धावसंख्या सहज उभारू दिली. मुंबई इंडियन्सकडे आता चार सामन्यांमधून केवळ दोन गुण आहेत आणि त्यांचा पुढील सामना १६ एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्ध होईल.