Rohit Sharma Apolgies: आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. ५ वेळचा चॅम्पियन संघ यावेळी १-१ विजय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून आला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ खूप आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. मुंबईचा साखळी फेरीतील शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध होणार आहे. हा सामना मुंबईसाठी फारसा महत्वाचा नसला, तरीदेखील राजस्थानला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्याआधी मुंबईचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सचा या हंगामातील १३ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध पार पडला. हा सामना कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला. इडन गार्डन्सचं मैदान हे रोहित शर्माचं आवडतं मैदान आहे. तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघाचे चाहते देखील रोहितची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान मुंबई इंडियन्सचा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्या हॉटेलच्या बाहेर क्रिकेट चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात एक फॅनगर्ल रोहितला भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होती. रोहित हॉटेलच्या बाहेर आला पण तिला न भेटताच निघून गेला. त्यामुळे त्या फॅनगर्लला अश्रू अनावर झाले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. व्हिडीओ रोहित शर्मापर्यंत पोहोचला, त्यानंतर रोहितने व्हिडीओ शेअर करुन तिची माफी मागितली. यासह पुन्हा इडन गार्डन्सवर आलो की नक्की भेटू, असं आश्वासन देखील दिलं. रोहित या व्हिडीओमध्ये म्हणाला, “मला माफ कर, मी तुला इडन गार्डन्सवर भेटू शकलो नाही. मी तुझा व्हिडीओ पाहिला, कधीकधी खूप गोंधळ असतो, खूप जास्त आवाज असतो. त्यामुळे लक्ष जात नाही. पण पुढच्या वेळी मी जेव्हा इडन गार्डन्सवर येणार मी नक्कीच तुझी भेट घेणार.” रोहितने आपल्या फॅनगर्लची दखल घेतल्याचा आणि माफी मागितल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतका मोठा खेळाडू आपल्या चाहत्यांची इतकी काळजी घेतो, हे पाहून नेटकऱ्यांनीही रोहितचं कौतुक केलं आहे.
मुंबईने आतापर्यंत झालेल्या १३ पैकी केवळ ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर उर्वरीत ९ सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ८ गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत ९ व्या स्थानी आहे. मुंबईचा या हंगामातील शेवटचा सामना राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध रंगणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. जर राजस्थानला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. जर राजस्थानने हा सामना गमावला, तर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सपैकी एका संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
