हैदराबाद : भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल या वेगवान गोलंदाजांना संघ व्यवस्थापनाचा पूर्ण पाठिंबा असून ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी त्यांना सूर गवसेल, असा विश्वास भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भुवनेश्वर आणि हर्षलने निराशाजनक कामगिरी केली. त्यांनी या मालिकेत १२हून अधिकच्या धावगतीने धावा खर्ची घातल्या. मात्र, या अनुभवी गोलंदाजांनी कर्णधार रोहितने पाठराखण केली आहे.

‘‘भुवनेश्वरला वेळ देण्याची गरज असून त्याच्यासारखा खेळाडू काय करू शकतो याची आम्हाला कल्पना आहे. त्याची पुन्हा लय सापडण्यासाठी फार वेळ लागणार नाही. आम्ही काही योजना आखल्या आहेत. अखेरच्या षटकांमध्ये त्याला गोलंदाजीचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. जेणेकरून त्याला पूर्वीप्रमाणे लय मिळवण्यास मदत होईल,’’ असे रोहित म्हणाला.

दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या हर्षलने तीन सामन्यांतील आठ षटकांमध्ये ९९ धावा दिल्या. मात्र, एका मालिकेच्या आधारे त्याच्या कामगिरीचे आकलन केले जाऊ शकत नाही असे रोहितला वाटते. ‘‘हर्षल आमच्यासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणे सोपे नसते. तो जवळपास दोन महिने सामने खेळलेला नाही. त्याच्या कामगिरीचे आकलन मालिकेतील तीन सामन्यांच्या आधारे केले जाऊ शकत नाही. त्याची क्षमता आम्हाला ठाऊक आहे,’’ असे रोहितने सांगितले.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील भारतीय संघाच्या कामगिरीबाबत रोहित म्हणाला, ‘‘आमचा प्रयत्न सर्व विभागात चांगली कामगिरी करण्याचा आहे. गेल्या आठ किंवा नऊ सामन्यांत फलंदाजांनी चांगला खेळ केला आहे. आमचा आणखी आक्रमक शैलीत खेळण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजीकडे आमचे मुख्य लक्ष आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेत प्रयोग होत असतात व ते पुढेही सुरूच राहतील.’’

विश्वचषकापूर्वी कार्तिकला अधिक संधी देण्याचा प्रयत्न!

ऑस्ट्रेलियामध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला अधिकाधिक संधी देण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचे रोहितने सांगितले. ‘‘विश्वचषक स्पर्धेपूर्वी कार्तिक आणि ऋषभ पंत या दोघांनाही संधी देण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्या मते दिनेशला अधिक वेळ देण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला फलंदाजीची फारशी  संधी मिळाली नाही,’’ असे रोहित म्हणाला.