Rohit Sharma gesture for Ground staff win hearts: रोहित शर्मा एक सर्वाेत्कृष्ट खेळाडू तर आहेच, पण रोहित एक उत्तम माणूस आहे; असं आपण अनेक माजी खेळाडूंना आणि त्याच्या सहकाऱ्यांना बोलताना आपण ऐकलं आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला. रोहित शर्माने ग्राऊंड स्टाफसाठी केलेल्या कृतीमुळे सर्वत्र त्याचं कौतुक आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेला रोहित शर्मा संघात परतला आहे. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो लखनौविरूद्ध खेळताना दिसणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या नेट सेशन दरम्यान रोहित शर्माच्या एका शॉटमुळे मैदानातील एक कर्मचारी जखमी झाला. चेंडू त्या कर्मचाऱ्याला लागताच, रोहितने फलंदाजी थांबवली आणि आईसपॅक घेऊन तात्काळ त्या व्यक्तीकडे धाव घेतली. इतकंच नाही, तर मुंबई इंडियन्सच्या या सलामीच्या फलंदाजाने त्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथकातील एका सदस्यालाही पाठवलं.

सिबन बिस्वास हे एक मैदान कर्मचारी आहेत, यांनी मिड डेला सांगितले, “जेव्हा रोहित शर्मा सरांनी आम्हाला ऑफ-साइडची जाळी काढायला सांगितली, तेव्हा आम्ही ती काढून बाजूला उभे राहिलो. मी दोऱ्या गोळा करण्यात व्यस्त होतो आणि खेळाडूंकडे माझे लक्ष नव्हते, तेव्हा अचानक एक चेंडू माझ्या डाव्या गुडघ्याला लागला. रोहित सर लगेच माझ्याकडे आले आणि त्यांनी दुखापतीबद्दल विचारले.”

सिबन पुढे म्हणाले, “मी त्याला फलंदाजीचा सराव करा, माझी काळजी करू नका असं सांगितलं, पण तो आईसपॅक घेऊन परत आला. त्याने माझ्यासाठी औषध आणि स्प्रे आणायलाही कोणालातरी पाठवलं.” आपल्या भावना व्यक्त करताना सिबन म्हणाले, “त्यावेळी ती एक विचित्र भावना होती. माझा गुडघा खूप दुखत होता, पण मला आनंदही झाला होता कारण मला रोहित सरांशी हस्तांदोलन करायला मिळालं.”

रोहित शर्माला आरसीबीविरूद्ध वानखेडेच्या मैदानावरील सामन्यात हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. त्यामुळे रोहित शर्मा बरेच सामने संघाबाहेर होता. यानंतर आता रोहित लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध ४ मे रोजीच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये परतला आहे. जवळपास ५ सामने बाहेर राहिल्यानंतर रोहितने फिटनेस परत मिळवला आहे. रोहित या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीसाठी उतरला आहे.