मुंबई : खेळाडूंवरील ताण कमी करण्यासह त्यांना मालिकांदरम्यान पुरेशी विश्रांती मिळावी आणि दुखापतींचा धोका कमी व्हावा, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अधिक नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. परदेशातील महत्त्वाच्या मालिकांपूर्वी खेळाडूंना पुरेशी विश्रांती दिली जाणार आहे. तसेच परदेश दौर्‍यात तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळावा आणि सराव सामने मिळावेत, यासाठी नव्या आराखड्यावर काम सुरू असल्याची माहिती ‘बीसीसीआय’चे सचिव देवजित सैकिया यांनी दिली.

‘बीसीसीआय’च्या मुंबई येथील मुख्यालयात गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीला कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल, ट्वेन्टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि उत्कृष्टता केंद्राचा (सीओई) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण उपस्थित होते. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर मात्र कौटुंबिक कारणांमुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

आयर्लंड आणि इंग्लंड दौर्‍यातील निराशाजनक कामगिरीचा बैठकीत आढावा घेण्यात आला. आयर्लंडविरुद्ध ट्वेन्टी-२०, तर इंग्लंडविरुद्ध ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिका भारताने गमावली. या कामगिरीमागची कारणे शोधून पुढील परदेश दौर्‍यांसाठी रणनीती तयार करण्यात आली.

खेळाडूंच्या दुखापतीबाबत संघ व्यवस्थापन आणि ‘सीओई’मध्ये समन्वयाचा अभाव नसल्याचे सैकिया यांनी स्पष्ट केले. तंदुरुस्ती आणि पुनर्वसन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. क्रीडा विज्ञान विभागाचे प्रमुखपद रिक्त असले तरी केंद्राचे काम सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘‘आमच्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे वर्षभरातील सामन्यांची संख्या. आमचे खेळाडू खूप सामने खेळतात. त्यामुळे दुखापतींचा धोकाही वाढतो. भविष्यात अधिक खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच ‘सेना’ देशांत (दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड) होणार्‍या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी खेळाडूंना तेथील वातावरण व परिस्थितीशी जुळवून घेता यावे, सराव सामने खेळता यावेत हे

लक्षात घेऊनच यापुढे वेळापत्रक तयार केले जाईल,’’ असे सैकिया म्हणाले.

रोहितचे स्थान सुरक्षित

एकदिवसीय संघातील रोहित शर्माच्या स्थानाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर सैकिया यांनी स्पष्ट भूमिका मांडली. रोहित उत्कृष्ट कामगिरी करत असून इंग्लंडविरुद्ध झालेल्या गेल्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात त्याने १३८ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याच्या स्थानाबाबत प्रश्न उपस्थित करण्याचे कारणच नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या करारवाढीबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही सैकिया यांनी स्पष्ट केले.

आशियाई स्पर्धेसाठी प्रशिक्षकपदी लक्ष्मण

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मण याच्याकडे सोपवण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांचे क्रिकेट सामने २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत खेळवले जाणार आहे. त्याच वेळी भारतीय संघाची वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत नियोजित आहे. त्यामुळे एकदिवसीय संघाला गौतम गंभीर मार्गदर्शन करेल, तर आशियाई स्पर्धेसाठी ट्वेन्टी-२० संघाचे प्रशिक्षकपद लक्ष्मण सांभाळेल.