लॉर्ड्सच्या मैदानावर रोहित शर्माने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडच्या संघाने विश्वविक्रमी धावसंख्या उभारली आहे. इंग्लंडने यासह भारताला विजयासाठी ३८८ धावांचं आव्हान दिलं आहे. यादरम्यान भारताची सलामी जोडी रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी सावध सुरूवात करत संघाच्या डावाची जबाबदारी घतेली आहे. यादरम्यान रोहित शर्माने मोठा विक्रम आपल्या नावे केला.
रोहित शर्मा व शुबमन गिलने सलामीला उतरताच सावध सुरूवात केली होती. दोघांनी वेळ घेत भारताचा डाव हळूहळू पुढे नेत आहेत. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी रचली आहे. शुबमन गिलने अर्धशतक केलं असून रोहित संधी मिळताच मोठे फटके खेळताना दिसत आहे. रोहित शर्माने जोश टंगच्या एका षटकात २ चौकार व एक षटकार लगावत सामन्याचा रोख बदलला. रोहितने या सामन्यात २ षटकार लगावताच मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
रोहित शर्माने ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला आहे. रोहितने ख्रिस गेलला मागे टाकत आता सेना संघांविरूद्ध सर्वाधिक षटकार लगावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. सेना (SENA) संघ म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चार संघांना एकत्रित सेना देश म्हटलं जातं. रोहित शर्माने ३४३ षटकार लगवात पहिलं स्थान गाठलं आहे. तर थ्रिस गेल ३४२ षटकारांसह दुसऱ्या स्थानी आहे. या दोघांव्यतिरिक्त इतर सर्व फलंदाज २०० षटकारांचा आकडाही गाठू शकलेले नाहीत.
रोहित शर्माचं क्रिकेटच्या पंढरीत शानदार अर्धशतक
एकिकडे रोहित शर्माचा भारतासाठी अखेरचा सामना अशी चर्चा सुरू असताना लॉर्ड्सच्या मैदानावर रोहितने अर्धशतकी खेळी साकारली आहे. रोहितने सावध आणि प्रसंगी आक्रमक फटके खेळत ६ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं आणि त्याच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं आहे.
सेना संघांविरूद्ध सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज
रोहित शर्मा – ३४३ षटकार
ख्रिस गेल – ३४२ षटकार
विराट कोहली – १७९ षटकार
एम एस धोनी – १७७ षटकार
शाहीद आफ्रिदी – १७६ षटकार
