Rohit Sharma Statement on ODI WC 2027: टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या टी-२० विश्वचषक २०२६ चा ब्रँड अम्बेसेडर आहे. रोहितने टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर टी-२० मधून तर त्यानंतर मार्च २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर रोहित शर्मा फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो. दरम्यान रोहित शर्माने एका कार्यक्रमात वनडे वर्ल्डकप खेळण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, रोहित फक्त ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसतो. भारताचा एकदिवसीय कर्णधार नसून आणि पुढच्या वर्षी ४० वर्षांचा होत असूनही, अनुभवी सलामीवीराने आगामी वर्ल्डकर स्पर्धेत खेळण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. यादरम्यान त्याने वनडे वर्ल्डकपशी असलेलं त्याचं कनेक्शनही सांगितलं आहे.

गेल्या वर्षी रोहितने एकदिवसीय सामन्यांमध्ये, विशेषतः ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत, मालिकावीर पुरस्कार पटकावत चमकदार कामगिरी केली होती. भारताने मालिका गमावली, पण तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद शतक झळकावून भारताला व्हाईटवॉशपासून वाचवलं. त्याच्या कामगिरीमुळे तो आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीतही अव्वल स्थानावर पोहोचला. तर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मालिकेत हा फॉर्म कायम होता. पण न्यूझीलंडविरूद्ध मालिकेत तो हा फॉर्म कायम ठेवू शकला नाही. यानंतर रोहितच्या वनडे क्रिकेटमधील भविष्याबाबत चर्चा सुरू होती.

केविन पीटरसनसोबत एका कार्यक्रमात बोलताना, “रोहितने २०२७ मध्ये विश्वचषक जिंकण्याची त्याची इच्छा असल्याचं सांगितलं. “मला नक्कीच मैदानावर उतरून माझ्या देशासाठी विश्वचषक जिंकायला आवडेल. ही गोष्ट माझ्या आयुष्यात नेहमीच महत्वाची राहिली आहे. मी लहानपणापासूनच ५० षटकांचा विश्वचषक पाहत मोठा झालो आहे. तेव्हा टी-२० वर्ल्ड कप नव्हता, IPL नव्हती आणि त्या काळी क्रिकेटमधील सर्वोच्च गोष्ट म्हणजे हा वर्ल्डकप होता, जो ४ वर्षांनी होत असे. त्यामुळे त्यावेळी वर्ल्डकप जिंकण्याची भूक खूप होती, त्या एका ट्रॉफीसाठी खूप चुरस होती, आणि होय, मला ती ट्रॉफी खरोखर जिंकायची आहे. त्यामुळे मी माझ्या क्षमतेनुसार आणि शक्य तितक्या मेहनतीने ती ट्रॉफी मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे,” रोहित शर्माच्या या वक्तव्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडविरूद्ध मालिकेत फेल ठरल्यानंतर त्याच्या वनडे क्रिकेटमधील भविष्याबाबत चर्चा होत असताना रोहितचं हे वक्तव्य समोर आलं आहे. रोहितचा फॉर्म चर्चेचा विषय असताना त्याला अजूनही ती ट्रॉफी जिंकण्याची जिद्द दिसत आहे. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताला फायनलमध्ये नेल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या पराभवानंतर, अनुभवी रोहितला सर्वात मोठ्या मंचावर अंतिम विश्वचषक खेळण्याची अंतिम संधी मिळवायची आहे.