Rohit Sharma launches new brand hydRO365 on his 39th birthday: सर्वांचा लाडका हिटमॅन रोहित शर्माचा आज ३० एप्रिल रोजी वाढदिवस आहे. हिटमॅन आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातून हिटमॅनवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. यादरम्यान रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर करत नवीन ब्रँड लाँच केला आहे. रोहितने नेहमीप्रमाणेच आपल्या खोडकर खेळकर मजेशीर अंदाजात नवा ब्रँड सुरू केल्याची आनंदाची बातमी दिली.
रोहित शर्माचा नवा ब्रँड नेमका काय आहे?
रोहित शर्माने हायड्रेशन ड्रिंकचा नवा ब्रँड सुरू केला आहे. या ब्रँडचं नाव हायड्रो ३६५ hydRO365 असं ठेवण्यात आलं आहे. आज वाढदिवसादिवशी म्हणजेच ३० एप्रिल २०२६ रोजी रोहितने हा ब्रँड लाँच केला आहे. हा ब्रँड ‘ॲडव्हान्स्ड हायड्रेशन’वर लक्ष केंद्रित करतो आणि त्याची टॅगलाइन आहे “पाणी पुरेसं नाही” (Water Is Not Enough). यापूर्वीच त्याने त्यांच्या ‘आरएस बाय ट्रू एलिमेंट्स’ (RS by True Elements) या हेल्थ फूड लाइनसाठी ट्रू एलिमेंट्ससोबत भागीदारी केली आहे.
रोहित शर्माने व्हीडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “मी नेहमीच मानतो की उत्तम कामगिरीची सुरुवात मूलभूत गोष्टींपासून होते. त्यात हायड्रेशन (शरीरातील पाण्याचे संतुलन) ही एक महत्त्वाची बाब आहे, पण आपल्यापैकी बहुतांश जण ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने करतो, कारण फक्त पाणी पुरेसं नसतं! दिवस सुरू होण्याआधीच सुमारे ७५% लोक डिहायड्रेटेड असतात. हीच समस्या लक्षात घेऊन मी hydRo³⁶⁵ तयार केलं आहे, जो हा बदल घडवून आणण्यासाठी आहे.”
“दिवसभरातील प्रत्येक टप्प्यासाठी आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स….सोपं, प्रभावी आणि दररोज १००% देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त! @hydro365.official आता लाईव्ह आहे आणि हे तुमचंच आहे,” असं रोहितने शेवटी कॅप्शनमध्ये लिहिलं.
hydRo365 हा ब्रँड लाँच केल्यानंतर तो आता अशा भारतीय खेळाडूंच्या वाढत्या गटात सामील झाला आहे, जे केवळ ब्रँड एंडोर्समेंटपुरते मर्यादित न राहता स्वतःचा ब्रँड उभे करत आहेत. विराट कोहलीचा One8 कॉम्युन आणि MS Dhoni (विविध व्यवसाय उपक्रम) यांच्यासारखेच रोहितही हेल्थ आणि वेलनेस क्षेत्रात थेट ब्रँड मालकीकडे वळला आहे.
