Rohit Sharma Records: भारतीय संघातील हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबई राजा अशी ओळख निर्माण केलेल्या रोहित शर्माचा जन्म १९८७ मध्ये नागपूरमध्ये झाला होता. २००७ टी -२० वर्ल्डकपपासून ते आतापर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. दरम्यान काही असे रेकॉर्ड देखील आहेत जे मोडणं कठीण नव्हे तर अशक्य आहे.

१) वनडे क्रिकेटमध्ये ३ दुहेरी शतकं

वनडे क्रिकेटमध्ये शतक पूर्ण करणं सोपं आहे. पण दुहेरी शतक पूर्ण करणं खूप कठीण आहे. हे कठीण काम रोहितने एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा केलं आहे. रोहितने नाबाद २००, २०९ आणि २६४ धावांची खेळी केली आहे.

२) वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड हा अजूनही रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात १७२ चेंडूत २६४ धावांची खेळी केली होती. ही आतापर्यंतची वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी आहे. हा रेकॉर्ड कुठल्याही फलंदाजाला मोडता आलेला नाही.

३) एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक शतकं

एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक शतकं करण्याचा रेकॉर्ड देखील रोहित शर्माच्या नावे आहे. रोहितने २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत ९ डावात ५ शतकं झळकावली होती. याआधी कुठल्याही फलंदाजाला ५ शतकं झळकावता आली नव्हती.

४) सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हा हिटमॅन म्हणून ओळखला जातो. त्याला ही ओळख चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडल्यामुळे मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या रेकॉर्डमध्ये रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत ६३७ षटकार खेचले आहेत. सर्वाधिक षटकार खेचण्याच्या रेकॉर्डमध्ये त्याने ख्रिस गेलसारख्या स्फोटक फलंदाजालाही मागे टाकले आहे.

५) आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड

२०२३ पर्यंत रोहितच्या नावे एकही आयसीसी ट्रॉफी नव्हती. पण त्यानंतर रोहितने एकाच वर्षात २ आयसीसी ट्रॉफी जिंकून इतिहासाला गवसणी घातली. रोहित शर्मा हा एकाच वर्षात २ आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिलाच कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २०२४ टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यानंतर २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही जेतेपदाचा मान पटकावला होता.