Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. या स्पर्धेनंतर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटलाही रामराम केलं. सध्या तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. नुकताच पार पडलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत रोहित शर्माचा बोलबाला पाहायला मिळाला. या स्पर्धेसाठी त्याची आयसीसीचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक सामन्यात भारतीय संघाला समर्थन करण्यासाठी मैदानात हजेरी लावत होता. दरम्यान अंतिम सामन्यातही रोहित शर्माचा क्रेझ पाहायला मिळाला.

भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडू मैदानात येऊन जल्लोष करताना दिसून आले. रोहितनेही मैदानात येऊन खेळाडूंचं अभिनंदन केलं. यादरम्यान त्याने जसप्रीत बुमराहच्या आईंची भेट घेतली. रोहित आणि जसप्रीत बुमराहच्या आईंचा भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोहित शर्मा जसप्रीत बुमराहच्या आई दलजीत बुमराह यांची भेट घेताना दिसून येत आहे. रोहितने त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासमोर झुकून नमस्कार (Bow) केला. रोहितने बुमराहच्या आईंना दिलेला आदर पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. नेटकऱ्यांनी, यालाच संस्कार म्हणतात.. अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोहितने बुमराहलाही मिठी मारून त्याचं अभिनंदन केलं.

भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय

स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात २५५ धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय संघाकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्मा आणि इशान किशनने दमदार अर्धशतकं झळकावली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना ९६ धावांनी आपल्या नावावर करून जेतेपदावर आपलं नाव कोरलं.