Rohit Sharma Breaks Sachin Tendulkar Record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरमच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात विराट कोहलीचा विराट शो पाहायला मिळाला. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात फलंदाजी करताना २९५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, विराट कोहलीने १३९ धावांची वादळी खेळी केली. तर शुबमन गिलने ११० धावांची खेळी केली. रोहित शर्माने ३२ धावांची खेळी केली. त्याचं अर्धशतक हुकलं असलं, तरीदेखील त्याने सचिन तेंडुलकरचा एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

रोहित शर्मा हा वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून २०० व्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. या डावात ३२ धावा करूनही तो वनडे क्रिकेटमधील सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. रोहितने सचिनला ६८० धावांनी मागे टाकलं आहे. रोहित शर्माच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून ९८९७ धावा करण्याची नोंद आहे. तर सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून २०० डावात फलंदाजी केल्यानंतर ९२१७ धावा केल्या होत्या. या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सौरव गांगुलीने सलामीवीर फलंदाज म्हणून २०० डावानंतर ७८८० धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने वनडेत सलामीवीर फलंदाज म्हणून २०० डावांनंतर ७६६९ धावा केल्या होत्या.

वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून २०० डावांनंतर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

रोहित शर्मा- ९८९७ धावा (भारत)
सचिन तेंडुलकर- ९२१७ धावा (भारत)
सौरव गांगुली- ७८७० धावा (भारत)
ख्रिस गेल- ७५५९ धावा (वेस्ट इंडिज)
सईद अनवर – ७५६४ धावा (पाकिस्तान)
डेसमंड हेन्स- ७४५४ धावा (वेस्ट इंडिज)
अॅडम गिलख्रिस्ट- ७१४७ धावा (ऑस्ट्रेलिया)
वीरेंद्र सेहवाग- ७०५१ धावा (भारत)
तमीम इकबाल- ६८७१ धावा (बांगलादेश)
सनथ जयसूर्या- ६७२७ धावा (श्रीलंका)

भारतीय संघाचा दमदार विजय

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेलने ६२ आणि जस्टीन ग्रीव्ह्सने १०१ धावांची खेळी केली. तर जंगूने ५८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने ५० षटकांअखेर ७ गडी बाद २९५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक १३९ धावांची खेळी केली. तर शुबमन गिलने ११० धावा करून भारतीय संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.