Rohit Sharma Emotional Video: आयपीएल २०२६ स्पर्धेतील २४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. वानखेडे स्टेडियम हा मुंबईचा गड मानला जातो. पण आता कुठलाही संघ येऊन मुंबईला आपल्याच घरच्या मैदानावर हरवून जातोय. मुंबईने पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर पुढील चारही सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईची ही निराशाजनक कामगिरी पाहून रोहित शर्मा हतबल झाला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ एक एक विजय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात फलंदाजी करताना १९५ धावा केल्या होत्या. पंजाबला हा सामना जिंकण्यासाठी १९६ धावांचा डोंगर सर करायचा होता. मुंबईकडे सर्वात अनुभवी गोलंदाजी आक्रमण आहे. त्यामुळे मुंबईचा संघ हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण गोलंदाजांचा योग्य वापर न केल्याने आणि सोपे झेल सोडल्याने मुंबईला हा सामना गमवावा लागला.
रोहितची भावूक प्रतिक्रिया…
रोहित शर्मा हा सामना खेळू शकला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला मैदान सोडून जावं लागलं होतं. तो अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली. रोहितचा या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावेळी मुंबईचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर होता, त्यावेळी रोहित डोक्याला हात लावताना दिसला. तो भावूक झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचे डोळे पाणावले असल्याचं दिसून येत आहे.
मुंबईचा पराभव
या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून क्विंटन डीकॉकने दमदार शतकी खेळी केली. तर नमन धीरने अर्धशतक झळकावलं. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर १९५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जकडून श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांनी अर्धशतकं झळकावली आणि पंजाबला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.
