Rohit Sharma Record: धर्मशाळेच्या एचपीसीए मैदानावर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून १६ हजार धावांचा टप्पा पार करणारा तो भारताचा दुसरा आणि जगातील अवघा सातवा फलंदाज ठरला आहे. या कामगिरीसह त्याने क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना २५-२५ षटकांचा करण्यात आला होता. भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ २४.५ षटकांत १९४ धावांवर सर्वबाद झाला. भारतासमोर विजयासाठी १९५ धावांचे आव्हान ठेवले.
षटकार ठोकून गाठला ऐतिहासिक टप्पा
धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्माला १६ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त ६ धावांची गरज होती. रोहितने मैदानात येताच आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत एक शानदार षटकार ठोकून हा जादुई आकडा पार केला. सलामीवीर म्हणून रोहित शर्माच्या नावावर आता १६,०१० धावा झाल्या असून, त्याने सचिन तेंडुलकरच्या (१५,३३५ धावा) विक्रमाला मागे टाकले आहे. आता त्याच्यापुढे केवळ वीरेंद्र सेहवाग १६,११९ धावा आहे.
डेव्हिड वॉर्नरला टाकले मागे, बनवला जागतिक विक्रम
रोहित शर्माने केवळ १६ हजार धावाच पूर्ण केल्या नाहीत, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद (सर्वात कमी डावात) हा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला सलामीवीर ठरला आहे. त्याने अवघ्या ३८४ डावांमध्ये ही कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचा (३९० डाव) जागतिक विक्रम मोडला. या यादीत ग्रीम स्मिथ (३९२) आणि वीरेंद्र सेहवाग (३९३) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
रोहित शर्मा ठरला दुर्दैवी ‘रन आऊट’
हा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर रोहित मोठी खेळी करेल असे वाटत होते. मात्र, १६ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १६ धावा करून तो दुर्दैवीरीत्या रन आऊट झाला. धाव घेताना शुभमन गिलसोबत झालेल्या ताळमेळाच्या अभावामुळे रोहितला आपली विकेट गमवावी लागली. बाद झाल्यानंतर रोहित अत्यंत निराश आणि संतापलेला दिसला, तो गिलकडे न पाहताच पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारताचा सर्वात वयस्कर वनडे क्रिकेटर
या सामन्यात मैदानात उतरताच रोहितच्या नावावर आणखी एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. ३९ वर्षे आणि ४४ दिवस वय असलेला रोहित शर्मा आता भारताकडून वनडे क्रिकेट खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने मोहिंदर अमरनाथ (३९ वर्षे ३६ दिवस) आणि सचिन तेंडुलकर (३८ वर्षे ३२९ दिवस) यांना मागे टाकले आहे.
