Rohit Sharma breaks Sachin Tendulkar record: रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरूद्ध एकदिवसीय क्रिकेट मालिकेत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. रोहितने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १२ हजार धावा पूर्ण करत एकदिवसीय क्रिकेटच्या विक्रमांच्या यादील आपलं नाव लिहिलं आहे. यासह आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही रोहित शर्माने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकत विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
भारताने चंदीगढमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताची सुरूवात मात्र खूपच खराब झाली. शुबमन गिल १ धाव करत विराट कोहली गोल्डन डकवर बाद झाला. तर या खेळपट्टीवर धावा करताना फलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागत आहेत. यादरम्यान रोहितने २ धावा करताच सलामीवीर म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
रोहित शर्माने सचिन तेंडुलकरचा २२ वर्षे जुना विश्वविक्रम मोडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध न्यू चंदीगड येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या वनडेत रोहितने सलामीवीर म्हणून सर्वात कमी डावांत १० हजार वनडे धावांचा टप्पा गाठला. त्याने अवघ्या २०२ डावांत हा पराक्रम केला. सचिन तेंडुलकरने २१४ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. सचिनने २००४ मध्ये ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
सलामीवीर म्हणून वनडेत १० हजार धावा करणारा रोहित शर्मा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि श्रीलंकेचा सनथ जयसूर्या यांचा समावेश आहे. रोहितला या ऐतिहासिक कामगिरीसाठी केवळ २ धावांची गरज होती. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर त्याने जेडन सील्सच्या गोलंदाजीवर शानदार फ्लिक करत दोन धावा घेतल्या आणि १० हजार धावांचा टप्पा सहज पार केला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावा करणारे फलंदाज
रोहित शर्मा – २०२ डाव, भारत वि. वेस्ट इंडिज, २०२६
सचिन तेंडुलकर – २१४ डाव, भारत वि. ऑस्ट्रेलिया, २००४
ख्रिस गेल – २६८ डाव, भारत वि. न्यूझीलंड, २०१९
सनथ जयसूर्या – ३०३ डाव, भारत वि. इंग्लंड, २००६
याआधीच्या सामन्यात रोहित शर्माने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीनंतर वनडेत १२ हजार धावा पूर्ण करणारा तिसरा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याने ७५ चेंडूंत १० चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १०१ धावांची शानदार खेळी केली होती.
या मालिकेपूर्वी रोहितवर मोठा दबाव होता. तो संघाचा पहिल्या पसंतीचा सलामीवीर होता, हे खरं; मात्र तरीही त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज होती. कारण अवघ्या काही आठवड्यांपूर्वी तत्कालीन मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी रोहितला सांगितलं होतं की, संघाला आता त्याच्यापुढे पाहायचं असून यशस्वी जैस्वालचा पर्याय आजमावण्याचा विचार आहे.
