Rohit Sharma On ICC ODI World Cup 2027: आगामी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेचा थरार दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने तयारी देखील सुरू केली आहे. पण संघातील सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा ही स्पर्धा खेळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोहितने गेल्या सामन्यात शतक झळकावून निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. पण त्याचं वर्ल्डकप संघातील स्थान अजूनही निश्चित नाही. दरम्यान वर्ल्डकप खेळण्याबाबत रोहितने मोठं वक्तव्य केलं आहे.

हा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. त्यामुळे रोहित शर्मासारखा अनुभवी खेळाडू संघात असणं खूप गरजेचं आहे. पण रोहितच्या खेळण्याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान गुरुवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात रोहितला वर्ल्डकप खेळण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित म्हणाला, “ऑक्टोबर २०२७ अजून खूप दूर आहे, तेव्हा बघूया.”

याआधी २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर वेस्ट इंडिजहून भारतात परतल्यानंतर भारतीय खेळाडूंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं होतं. यासह बसमधून विजयी परेड काढण्यात आली होती. या कार्यक्रमादरम्यान रोहितला प्रश्न विचारण्यात आला की, भारताने जेतेपदाची ट्रॉफी जिंकल्यास २०२४ प्रमाणे विजयी बस परेड काढली जाईल का? यावर उत्तर देताना रोहित म्हणाला की, “मला नाही वाटत की, आता बस परेड काढणं शक्य होईल.”

रोहित निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं होतं की, रोहित निवृत्ती घेणार नाही. तसेच पुढे ते म्हणाले की, रोहित दिग्गज फलंदाज आहे आणि तो चांगली फलंदाजी करतोय. भारतीय संघासाठी खेळताना शेवटच्या सामन्यात त्याने शतक झळकवलं होतं.

देवजीत सैकिया म्हणाले, “तो सर्व सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत आहे. गेल्या सामन्यात त्याने १३८ धावा केल्या होत्या. मग या चर्चा कशाला?” यावरून हे स्पष्ट होतंय की, रोहित आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतो.