Rohit Sharma Runout Video, IND vs NZ 1st ODI: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे अनुभवी खेळाडू संघात परतले आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरूवात करून दिली. यादरम्यान रोहितच्या चपळतेमुळे डॅरिल मिचेलला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं आहे. रोहितने मारलेल्या भन्नाट थ्रो चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काही वर्षांपूर्वी रोहित शर्माला फिटनेसमुळे ट्रोल केलं जात होतं. पण रोहितने आपल्या फिटनेसवर मेहनत घेतली आणि ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली होती. आता फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही त्याची जादू पाहायला मिळते. वयाच्या ३९ व्या वर्षीही रोहित वेगाने धावून डाईव्ह मारून चेंडू अडवतो. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडेत त्याने चित्त्याच्या चपळाईने डाईव्ह मारून चेंडू अडवला आणि डॅरिल मिचेलला धावबाद करत माघारी धाडलं.
तर झाले असे की, भारतीय संघाकडून २२ वे षटक टाकण्यासाठी अक्षर पटेल गोलंदाजीला आला. त्यावेळी ग्लेन फिलिप्स स्ट्राईकवर होता. या षटकातील पहिलाच चेंडू त्याने पायावर टाकला. हा चेंडू फिलिप्सने ढकलला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण रोहितने डाईव्ह मारून चेंडू अडवला आणि वेगाने थ्रो केला. यष्टीरक्षण करत असलेल्या केएल राहुलने चेंडू पकडला आणि डॅरिल मिचेलला धावबाद करत माघारी धाडलं. या भन्नाट थ्रो मुळे डॅरिल मिचेलचा डाव अवघ्या २८ धावांवर आटोपला.
या सामन्यात अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन):
टिम सेफर्ट, विल यंग, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर

भारत (प्लेइंग इलेव्हन):
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टिरक्षक), नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग</p>
