Dinesh Lad On Rohit Sharma Retirement: कार्डिफच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमधील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो ४७ चेंडूंमध्ये अवघ्या २६ धावा करुन माघारी परतला. गेल्या सामन्यातही तो अवघ्या ११ धावा करुन माघारी परतला होता. माध्यमातील वृत्तानुसार, लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा तिसरा वनडे सामना हा रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. या सामन्यानंतर तो निवृत्तीची घोषणा करु शकतो. रोहितच्या निवृत्तीच्या चर्ता चालू असताना, त्याचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

लॉर्ड्सच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणार?

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये त्याला केवळ ३७ धावा करता आल्या आहेत. पहिल्या सामन्यात ११ तर दुसऱ्या सामन्यात तो अवघ्या २६ धावा करुन माघारी परतला. रोहित गेल्या १ दशकापासून भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करतोय. पण आगामी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेसाठी निवडकर्त्यांना नवा सलामीवीर फलंदाज हवा आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या जागी यशस्वी जैस्वालला वर्ल्डकपमध्ये सलामीवीर म्हणून संधी दिली जाऊ शकते. पण याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी एबीपीला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, रोहित शर्मा लॉर्ड्सच्या मैदानावर शेवटचा खेळणार आहे, याबाबत तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, “मला मनापासून असं वाटतं की, त्याने २०२७ चा वर्ल्डकप खेळावं. माझी हिच इच्छा आहे, त्याने २०२७ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करावं.”

तसेच My khel ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिनेश लाड म्हणाले की, “मला नाही वाटत रोहित संघर्ष करतोय. जर असं असतं, तर त्याने कधीच निवृत्तीची घोषणा केली असती. लोकांना त्याच्याकडून खूप आशा आहेत, तो खूप चर्चेत आहे. तो वर्ल्डकपसाठी १०० टक्के पात्र आहे.” याआधी रोहितनेही वनडे वर्ल्डकप खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. क्रिकेट कारकिर्द शेवटच्या टप्प्यात असताना, फक्त वर्ल्डकप खेळायचं आहे म्हणून त्याने १५ किलो वजन कमी केलं होतं. अजूनही तो फिटनेवर मेहनत घेत आहे. पण निवडकर्त्यांना तो संघात नको आहे. निवडकर्त्यांनी रोहितला आधीच स्पष्ट केलं आहे की, तो २०२७ मध्ये होणाऱ्या वर्ल्डकप सेटअपचा भाग नाही. त्यामुळे निवृत्ती घेण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही.