Rohit Sharma Completed 14000 Runs In List A Cricket: अफगाणिस्तानचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्माने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या डावात षटकार मारताच रोहितने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १४००० धावा पूर्ण केल्या आहेत.

टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रोहित फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. पण त्याच्या फलंदाजीतील धार काही कमी झालेली नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं होतं. या सामन्यातही त्याने दमदार सुरुवात केली. पण त्याला ४८ धावांवर माघारी परतावं लागलं आहे. राशिद खानने टाकलेल्या भन्नाट चेंडूवर रोहितची दांडी गुल झाली.त्यामुळे त्याचं अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकलं. आधी चौकार आणि मग षटकार खेचून त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १४००० धावांचा पल्ला गाठला आहे. अशी कामिगिरी करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविडसारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे.

या यादीत अव्वल स्थानी असलेल्या सचिन तेंडुलकरच्या नावे लिस्ट ए क्रिकेटमध्ये २१९९९ धावा करण्याची नोंद आहे. तर विराट कोहलीच्या नावे १६४४७ धावा करण्याची नोंद आहे. या य यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सौरव गांगुलीने १५६२२ धावा केल्या आहेत. तर राहुल द्रविड या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने १५२७१ धावा केल्या होत्या. आता या दिग्गजांच्या यादीत रोहित शर्माचं देखील नाव जोडलं गेलं आहे. रोहितने १४००० धावा केल्या आहेत.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

सचिन तेंडुलकर- २१९९९ धावा
विराट कोहली- १६४४७ धावा
सौरव गांगुली- १५६२२ धावा
राहुल द्रविड- १५२७१ धावा
रोहित शर्मा- १४००७ धावा