Rohit Sharma Record: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी मैदानावर आली. या जोडीने मिळून पहिल्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या. यादरम्या. रोहित शर्मा अवघ्या २४ धावा करत माघारी परतला. दरम्यान त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
रोहित शर्माने एशियात फलंदाजी करताना ७००० धावा पूर्ण केल्या आहेत. तो असा फलंदाज करणारा सातवा फलंदाज ठरला आहे. रोहितआधी एमएस धोनीने हा विक्रम आपल्या नावावर केला होता. धोनीच्या नावे आशियात फलंदाजी करताना ७१०३ धावा करण्याची नोंद आहे. रोहित शर्माने ७०१९ धावा केल्या आहेत.
एशियामध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने १२,०६७ धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराट कोहलीने ९१२१ धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या सनथ जयसुर्याने ८४४८ धावा केल्या आहेत.
एशियामध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर, भारत – १२,०६७ धावा
विराट कोहली, भारत – ९१२१ धावा
सनाथ जयसूर्या, श्रीलंका – ८४४८ धावा
कुमार संगकारा, श्रीलंका – ८२४९ धावा
महेला जयवर्धने, श्रीलंका – ७३४२ धावा
एमएस धोनी, भारत – ७१०३ धावा
रोहित शर्मा, भारत – ७०१९ धावा
भारतीय संघाने ठेवलं २८५ धावांचं आव्हान
या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात आला होता. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना रोहित शर्माने २४ धावांची खेळी केली. तर शुबमन गिलने ५६ धावा केल्या. विराट कोहलीने २३ धावा केल्या. श्रेयस अय्यर ८ धावा करत माघारी परतला. केएल राहुलने नाबाद ११२ धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने २७ धावांची खेळी केली. भारतीय संघाने ५० षटकांअखेर ७ गडी बाद २८४ धावा केल्या.
