Rohit Sharma Sixes Record At Home: गुवाहाटीतील बारसापरा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. दरम्यान वेस्ट इंडिजकडून ३ फलंदाजांनी दमदार शतकं झळकावली. या शतकी खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने ७ गडी बाद ४०५ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने वेगवान सुरूवात करून दिली. यादरम्यान त्याने षटकारांचा सर्वात मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये २०० षटकार
रोहित शर्माला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये षटकारांचा बादशहा असं म्हटलं जातं. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. ४०६ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ज्या सुरूवातीची गरज होती, ती रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने करून दिली. अवघ्या ३३ चेंडूंमध्ये त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार खेचले. यासह वनडे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर खेळताना २०० षटकार खेचणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी कुठल्याही फलंदाजाला असा रेकॉर्ड करता आलेला नाही. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ख्रिस गेलने १४७ षटकार खेचले आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या मार्टिन गप्टीलच्या नावे १३२ षटकार खेचण्याची नोंद आहे.
घरच्या मैदानावर खेळताना सर्वाधिक षटकार खेचणारे फलंदाज
रोहित शर्मा- २०० षटकार*
ख्रिस गेल- १४७ षटकार
मार्टिन गप्टील- १३२ षटकार
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा आधीपासून अव्वल स्थानी आहे. रोहितने आतापर्यंत ३७६ षटकार खेचले आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या शाहिद आफ्रिदीच्या नावे ३५१ षटकार खेचण्याची नोंद आहे. वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलने ३३१ षटकार खेचले आहेत. तर सनाथ जयसूर्याच्या नावे २७० आणि एमएस धोनीच्या नावे २२९ षटकार खेचण्याची नोंद आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याच्या रेकॉर्डमध्येही रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. रोहित शर्माने वनडे, टी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये मिळून ६६५ षटकार खेचले आहेत.
