Rohit Sharma Record In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. कारण गुणतालिकेतील ९ व्या १० व्या स्थानी असलेल्या संघांमध्ये झालेल्या या सामन्यात जो संघ जिंकणार तो स्पर्धेत टिकून राहणार होता, तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडणार होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सने धावांचा पाठलाग करताना पूर्ण जोर लावला. २२९ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून रायन रिकल्टने ८३ धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने आयपीएल स्पर्धेतील सर्वात मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

हा मुंबई इंडियन्सचा या हंगामातील तिसराच विजय आहे. याआधी झालेल्या १० पैकी ७ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. १२ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरूद्ध झालेल्या सामन्यादरम्यान रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो संघाबाहेर होता. आता लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याला पुनरागमन करण्याची संधी मिळाली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. यासह संघाचा आत्मविश्वासही उंचावला.

रोहितने धावांचा पाठलाग करताना २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्याने ४४ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने ८४ धावांची खेळी केली. ही मुंबई इंडियन्सकडून सर्वोत्तम खेळी ठरली. यासह रोहित शर्माच्या नावे खास रेकॉर्डची नोंद झाली आहे. रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेत आपल्या संघासाठी सर्वाधिक वेळेस सर्वोत्तम खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. रोहित शर्माने आतापर्यंत ६० वेळेस आपल्या संघासाठी सर्वात मोठी खेळी केली आहे. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या विराट कोहलीने सर्वाधिक ६९ वेळेस मोठी खेळी केली आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या डेव्हिड वॉर्नरने ६६ वेळेस सर्वात मोठी खेळी केली आहे. तर शिखर धवनने हा कारनामा ५६ वेळेस केला आहे. तर केएल राहुलने ४६ वेळेस आणि ख्रिस गेलने ४४ वेळेस केला आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज

विराट कोहली: ६९ वेळा

डेव्हिड वॉर्नर: ६६ वेळा

रोहित शर्मा: ६० वेळा

शिखर धवन: ५६ वेळा

केएल राहुल: ४६ वेळा

ख्रिस गेल: ४४ वेळा

मुंबई इंडियन्सचा दमदार विजय

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने २० षटकांअखेर २२८ धावांचा डोंगर उभारला. लखनौकडून मिचेल मार्शने ४४ धावांची खेळी केली. तर निकोलस पूरनने दमदार अर्धशतक झळकावलं. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. तर रायन रिकल्टनने ८३ धावा केल्या. या दमदार खेळीच्या बळावर मुंबईने ६ गडी राखून विजय मिळवला.