Jonty Rhodes Statement On Rohit Sharma: आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे माजी फिल्डींग कोच जॉन्टी ऱ्होर्ड्स यांनी रोहित शर्माबरोबर काम करतानाचा अनुभव सांगितला. रोहित शर्माबद्दल बोलताना जॉन्टी ऱ्होर्ड्स यांनी रोहितच्या फलंदाजीबद्दल त्याच्या स्वभावाबद्दलही भाष्य केलं. जॉन्टी ऱ्होर्ड्सने असही सांगितलं की रोहित शर्मा नेटमध्ये सराव करताना सचिन तेंडुलकर इतका कठोर सराव करत नाही आणि त्याचं टेक्निकही (तंत्र) सर्वाेत्तम नाही.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने गेल्या काही वर्षांत सलामीवीर फलंदाज म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. हिटमॅनने मधल्या फळीतील फलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, परंतु २०१३ मध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला सलामीवीराची जबाबदारी दिल्यानंतर रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. रोहित आता दहा हजारांहून अधिक एकदिवसीय धावांसह भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वाेतकृष्ट सलामीवीरांपैकी एक आहे.
रोहित शर्मा उत्कृष्ट फलंदाज तर आहेच पण तो चांगला कर्णधारही आहे. २०१३ ते २०२३ या कालावधीत त्याच्या नेतृत्त्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. आता मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्स यांनी मोठा खुलासा केला आहे. ऱ्होड्सने रोहितसोबत आयपीएलमध्ये काम करतानाच्या त्याच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला.
मुंबई इंडियन्सचे माजी फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्सचे रोहित शर्मावर मोठे वक्तव्य
ऱ्होड्सने अलीना डिसेक्ट्सच्या YouTube पॉडकास्टवर बोलताना सांगितले की, “तो अजिबात बदलला नाहीय. माझ्या डोळ्यासमोर अजूनही ते चित्र आहे की तो (रोहित शर्मा) फलंदाजीचा सराव करण्यासाठी नेटमध्ये यायचा आणि तेव्ह काही थ्रो डाईन सेशन आणि शॅडो हिटिंग याचाही सराव करायचा. तो सचिन तेंडुलकरसारखा खूप वेळ किंवा कठीण सराव करायचा नाही हे खरं. तो कदाचित नेट्समध्ये तर नाही तर दुसरीकडे सराव करायचा. पण मला वाटतं की त्याच्याकडे सर्वाेत्तम टेक्निक नाहीय.”
ऱ्होड्स पुढे रोहित शर्माबद्दल बोलताना म्हणाला की, रोहित त्याच्या स्वभावामुळे आणि फलंदाजी करताना ज्याप्रकारेतो त्याच्या हाताचा, मनगटांचा वापर करतो यामुळे त्याने जास्त यश मिळवले आहे. ऱ्होड्स म्हणाले, “रोहित शर्मावर फलंदाजी करताना अनेकदा पायाची फारशी हालचाल न केल्यामुळे टीका होत असते, परंतु तो क्रीजवर खूप आरामात असतो आणि तो हाताचा, मनगटाचा खूप चांगला वापर करतो. त्याला खेळताना पाहणं एक चांगला अनुभव आहे कारण तो अजूनही तसाच आहे, स्वत:शी प्रामाणिक आहे आणि माझ्या मते हेच खूप महत्त्वाचं आहे.”