Rohit Sharma shares late night post on Ajinkya Rahane retirement: भारतीय क्रिकेटमधील सर्वात भरवशाच्या फलंदाजांपैकी एक असलेल्या अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जवळपास दोन दशकं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रहाणेने इन्स्टाग्रामवर एका भावूक व्हिडिओद्वारे आपल्या निर्णयाची माहिती चाहत्यांना दिली. निवृत्तीबद्दल सांगताना अजिंक्य भावुक झालेला पाहायला मिळाला. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर क्रिकेट विश्वातून विविध प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे. विराट कोहली, सचिन तेंडुलकरनंतर आता रोहित शर्माने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

मुंबई संघातील रहाणेचा सहकारी रोहित शर्मा यानेही एक भावूक पोस्ट लिहीत, त्याच्या शानदार कारकिर्दीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. रोहित शर्माने सोशल मीडियावर रहाणेसाठी एक खास मेसेज लिहिला. रोहितने रहाणेबरोबरचा कसोटी सामन्यातील पोस्ट शेअर केला आणि त्याची मेहनत, समर्पण आणि व्यावसायिक दृष्टिकोन त्याला नेहमीच इतरांपेक्षा वेगळे ठरवत आला आहे असं म्हणत रोहितने त्याचं कौतुक केलं.

रोहितने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “आपण अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये एकत्र वेळ घालवला आहे. तुझ्या प्रत्येक यशामागील कठोर परिश्रमांचा मी साक्षीदार आहे. तुझ्या समर्पणाने, मेहनतीने आणि व्यावसायिक दृष्टिकोनामुळे तू नेहमीच इतरांपेक्षा वेगळा ठरलास. तुझ्या शानदार कारकिर्दीसाठी मनःपूर्वक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा.”

अजिंक्य रहाणेचा कर्णधार म्हणून कमालीचा रेकॉर्ड

रोहित शर्माने भारतीय संघाचं कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसला आहे. रहाणेचं नेतृत्त्वदेखील उत्कृष्ट राहिलं आहे. भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना त्याने सहा सामन्यांत चार विजय आणि दोन सामने अनिर्णित राखले. विशेष म्हणजे, किमान पाच कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये त्याची विजयाची टक्केवारी सर्वोत्तम आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय पर्व म्हणजे २०२०-२१ ची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी होय.

ॲडलेड कसोटीतील भारताच्या दारुण पराभवानंतर आणि नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर, रहाणेने संघाची धुरा सांभाळली. मेलबर्नमधील ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत शतक झळकावून त्याने भारताला शानदार विजय मिळवून दिला आणि त्यानंतर ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ऐतिहासिक मालिका विजय साकारला; या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा दीर्घकाळापासूनचा ‘अजिंक्य’ राहण्याचा विक्रमही मोडला गेला. याव्यतिरिक्त, त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने यापूर्वी २०१७ मधील धरमशाला कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिका जिंकली होती.

Rohit Sharma Instagram Story
रोहित शर्मा इन्स्टाग्राम स्टोरी

अजिंक्य रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी सामन्यांत ५,०७७ धावा केल्या. या दरम्यान त्याने १२ शतकं आणि २६ अर्धशतकं झळकावली. कसोटी क्रिकेटमधील त्याची फलंदाजीची सरासरी ३८.४६ इतकी होती. एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये त्याने ९० सामन्यांत ३५.२६ च्या सरासरीने २,९६२ धावा केल्या, ज्यामध्ये ३ शतकं आणि २४ अर्धशतकांचा समावेश होता. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रहाणेने २० सामन्यांत ३७५ धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.