Rohit Sharma Reaction on Virat Kohli Century Video Viral: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने उत्कृष्ट शतकी खेळी केली. विराटच्या या शतकासह भारताने प्रथम फलंदाजी करताना ३४९ धावांचा मोठा आकडा गाठला. रांचीच्या मैदानावर विराट कोहलीची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. विराटने चौकार लगावत आपलं शतक पूर्ण करताच सर्वांनी त्याचं कौतुक केलं. यादरम्यान रोहित शर्माने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
यशस्वी जैस्वाल लवकर बाद झाल्यानंतर मैदानावर येताच विराट सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता आणि त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. यासह विराट कोहली व रोहित शर्माने मिळून १३६ धावांची भागीदारी रचत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रोहित शर्मा ५७ धावा करत बाद झाला, पण विराटने मात्र आता आपली वादळी फटकेबाजी सुरूच ठेवली.
विराट कोहलीला आपलं शतक पूर्ण करण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. एका टोकाकडून विकेट्स लागोपाठ गेल्यानंतर विराटने सावध फलंदाजी केली. विराटने ९९ धावांवर असताना तो एक धाव घेण्यासाठी धावणार तितक्यात राहुलने त्याला अडवलं. त्यावेळेस रोहित शर्मा त्याला थांब थांब असं हातवारे करत सांगताना दिसला. त्यानंतर विराटने चौकार लगावत अखेरीस त्याचं शतक पूर्ण केलं. शतक पूर्ण होताच विराटने हवेत उंच उडी घेत जणू गर्जना करत शतकाचा आनंद साजरा केला.
हिटमॅनची विराटच्या शतकावर रोहित शर्मा स्टाईल भन्नाट प्रतिक्रिया
विराटचं शतक होताच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्वांनीच उभं राहून टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं. यावेळेस रोहित शर्माने त्याच्या बम्बईया स्टाईलमध्ये शिवी घालत विराटच्या शतकाचं सेलिब्रेशन केलं. विराटच्या शतकाच्या सेलिब्रेशनदरम्यान एक चाहता मैदानात घुसत त्याच्या पाया पडताना दिसला. दरम्यान रोहितच्या या प्रतिक्रियेचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
कोहली आणि रोहितने दुसऱ्या विकेटसाठी १०३ चेंडूत १३६ धावांची भागीदारी केली. विराटने ४७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, कोहलीने केवळ १०२ चेंडूत त्याचं ८३ वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं. कोहलीने यासह १२० चेंडूंत ११ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने १३५ धावांची दमदार खेळी केली.
