Rohit Sharma Fan Girl Video: मुंबईचा राजा रोहित शर्माचा मोठा चाहता वर्ग आहे. रोहित शर्माला भेटायला आलेल्या चाहतीचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. रोहितला पाहताच ती चाहती आनंदाने ओरडत त्याच्याजवळ गेली आणि त्यानंतर त्यांच्यातील संवादाचा व्हीडिओ व्हायरल झाला. मुंबई इंडियन्सचा संघ यंदा प्लेऑफच्या शर्यतीतून लवकर बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर असला तरी संघ कडवी झुंज देताना दिसत आहे.
आयपीएल २०२६ मध्ये हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतर रोहित शर्मा गेल्या सामन्यात संघात परतला आणि त्याने ८४ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मुख्या भूमिका बजावली. रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे मुंबईचा संघ अधिक मजबूत झाला. मुंबईला आता पुढील सामना रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध खेळायचा आहे. या सामन्यापूर्वीचा रोहितचा चाहत्यांबरोबरचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकताना दिसला. आपल्या शांत पण मिश्कील स्वभावासाठी ओळखला जाणारा माजी कर्णधार एका चाहतीसोबतच्या गोड संवादामुळे सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना रोहित मुंबई इंडियन्सच्या टीम बसकडे जात असताना घडल्याचं दिसत आहे. एका चाहतीने त्याच्याकडे सेल्फीची विनंती केली. मात्र फोटो काढण्यासाठी ती फोन तयार करत असतानाच तिचा मोबाईल अचानक बंद पडला.
रोहित शर्माला पाहताच चाहती आनंदाने ओरडत त्याच्याजवळ पोहोचली आणि रोहितला तिने हात मिळवला. रोहितबरोबर सेल्फी काढण्यासाठी फोन ऑन करताना तुम्ही बेस्ट आहात बेस्ट आहात… हे सातत्याने ती बोलत होती. यादरम्यान तिचा कॅमेरा सुरू होत नव्हता आणि रोहितने दुसऱ्या छोट्या चाहत्याला बोलावून घेतलं आणि फोटो काढला. त्यानंतर रोहित टीम बसकडे निघाला.
तितक्यात त्या चाहतीने जोरात आवाज देत सांगितलं, थांबा थांबा माझा फोन बंद झालाय. तितक्यात रोहित आपल्या मजेशीर अंदाजात म्हणाला, “अरे मी काय करू तर मग…” तितक्यात ती महिला चाहती रोहित शर्मासोबत फोटो काढण्यासाठी कोणाचा तरी फोन घेतला आणि टीम बसकडे धावत आली आणि म्हणाली सॉरी सर सॉरी…, माझा तर श्वासच बंद झाला आहे, तुम्हाला भेटून. यानंतर रोहित सेल्फी काढून टीम बसमध्ये जातो आणि ती महिला चाहती आनंदाने ओरडत बाजूला जाते.
