Rohit Sharma Viral Video Mumbai Indians MIX Event: आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने चाहत्यांसाठी एक खास कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. मुंबईचा प्री-सीझन ‘द मिक्स’ हा दोन दिवसीय कार्यक्रम सुरू आहे. पहिला दिवस २१ मार्च तर दुसरा दिवस २२ मार्च असे दोन दिवसांचे इव्हेंट आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी मुंबई इंडियन्सच्या संपूर्ण संघाने उपस्थिती लावली. यादरम्यान संपूर्ण संघाला अचानक आलेलं पाहून सर्वच चाहत्यांना सरप्राईज मिळालं. पण यादरम्यान रोहित शर्मासाठी चाहत्यांमध्ये असलेल्या क्रेझने सर्वांचं लक्ष वेधलं.

मुंबई इंडियन्सने जिओ वर्ल्ड गार्डन मैदानावर एक दोन दिवसीय सोहळ्याचं आयोजन केलं आहे. जिथे एमआय डगआऊट तयार करण्यात आलं आहे. ज्यात ड्रेसिंग रूम तयार करून सर्व खेळाडूंचं नाव असलेल्या जर्सी आहेत. त्याशिवाय आतमध्ये विविध खेळांचं आयोजन केलं आहे. तर स्टेजवर विविध कलाकारांचे लाईव्ह परफॉर्मन्स ठेवण्यात आले आहेत. यादरम्यान रॅपर डिव्हाईनचा परफॉर्मन्स सुरू असताना मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ स्टेजवर पोहोचला.

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ अचानक मैदानावर येत त्यांनी चाहत्यांना सरप्राईज दिलं. यंदा संघाचा भाग असलेले सर्व खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्यासह स्टेजवर होते. खेळाडूंनी खास चेंडू आणि जर्सी चाहत्यांमध्ये थ्रो करताना दिसले. यानंतर सर्व खेळाडू खाली उतरले आणि हार्दिक पंड्या व सूर्यकुमार यादव या खेळाडूंना स्टेजवर थांबण्याची विनंती केली. त्या दोघांसोबत रोहित शर्मा नसलेला पाहून चाहत्यांनी एकच कल्ला केला.

रोहित शर्मा इतर संघाबरोबर खाली उतरला आणि चाहत्यांनी रोहित रोहितची नारेबाजी सुरू केली. कर्णधार हार्दिक पंड्याकडे माईक सोपवला असला तरी चाहत्यांनी मात्र रोहित शर्माचं स्टेजवर हवा होता. रोहित मैदानावर येईपर्यंत चाहते थांबलेच नाहीत. त्यानंतर सूर्याने माईक घेतला आणि विचारलं, “काय बोलती पब्लिक? रोहित शर्मा” त्यानंतर आवाज जोरात वाढला. पण रोहित काही स्टेजवर येईना. शेवटी सूर्यानेच सांगितलं, आता तुम्हीच जोरात आवाज देऊन त्याला बोलवा. त्यानंतर मुंबईचा राजा रोहित शर्माचे चाहत्यांनी नारे दिले.

रोहित शर्माने सहावी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं चाहत्यांना दिलं वचन

चाहत्यांचं भरभरून प्रेम आणि त्याची क्रेझ पाहता रोहित शर्मा अखेरीस स्टेजवर आला आणि त्याने सूर्या व हार्दिकची भेट घेतली. यानंतर सूर्याने रोहितला बोलण्याची विनंती केली. पण रोहितने काही ऐकलं नाही. यानंतर अखेरीस हिटमॅनने ऐकलं आणि म्हणाला, “मी टीमकडून सर्वांचे आभार मानतो आणि दरवर्षीप्रमाणे संघाला असाच सपोर्ट करा. आम्ही हाच प्रयत्न करू की यावर्षी सहा क्रमांकाची ट्रॉफी जिंकून तुम्हाला देऊ. थँक्यू सो मच.” असं रोहितने म्हणत तिघेही खेळाडू एकत्र स्टेजवरून निघाले.

रोहित शर्मासाठी चाहत्यांची क्रेझ पाहून हार्दिक-सूर्याही स्टेजवर पाहतच राहिले. रोहित आल्याशिवाय चाहत्यांचा आवाज काही शांत झाला नव्हता. मुंबई इंडियन्सच्या इव्हेंटमधील हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.