Rohit Sharma Ranchi Airport Viral Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. आता संघ दुसरा सामन्यासाठी रवाना झाला आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी पहिल्या सामन्यात १३६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रोहित शर्माने वजन घटवल्यानंतर सध्या त्याच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. पण विसरभोळा रोहित शर्मा मात्र बिलकुल बदललेला नाही. रोहितचा विमानतळावरील एक व्हीडिओ समोर आला आहे.

रोहित शर्माच्या विसरभोळेपणाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. रोहितचे संघातील सहकारी खेळाडू, त्याची पत्नी, मित्र सर्वांनीच त्याच्या विसरभोळेपणाबद्दल सांगितलं आहे. पण रोहित शर्मा स्वत:देखील चाहत्यांना याची एक झलक प्रत्येक दौऱ्यावर देतोच. रोहित प्रत्येक दौऱ्यावर काही ना काही त्याच्या वस्तूच विसरतोच. याचा एक व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

रोहित शर्माचा रांची एअरपोर्टवरील VIDEO होतोय व्हायरल

पहिल्या वनडे सामन्यानंतर संघ रांची विमानतळावर पोहोचला. रांचीमधील टीम हॉटेल ते विमानतळ हा प्रवास संघाने टीम बसने केला. या टीम बसमध्ये रोहित शर्मा त्याच्या एअरपॉडची केस विसरला आणि एअरपॉड लावून तो एअरपोर्टच्या वेटिंग एरियामध्ये पोहोचला. रोहित शर्मा बसला असताना त्याला कल्पनाही नव्हती की एअरपॉडची केस विसरला आहे.

तितक्यात टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील एक जण रोहित शर्माजवळ येतो आणि त्याला ही एअरपॉडची केस देतो. रोहितला हे कळताच लगेच तो त्यांचे आभार मानतो. रोहितला एअरपॉड देताना स्वत: ती व्यक्तीदेखील हसत असते. हे पाहून समोर बसलेला नितीश रेड्डीदेखील हसू लागतो. रोहितचा रांची एअरपोर्टवरील हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

रोहित शर्माला त्याच्या वस्तू विसरण्याची सवय खूप पूर्वीपासून आहे. रोहितची पत्नी रितिकाने देखील हरभजन सिंग व त्याच्या पत्नीच्या पोडकास्टमध्ये याबद्द सांगितलं होतं की, रोहितला गेल्या कितीही वर्षांमधील क्रिकेटच्या सामन्यातील एखाद्या चेंडूवर काय घडलं होतं, हे विचारा तो लगेच सांगेल… पण त्याचा मोबाईल त्याने कुठे ठेवला आहे ते आठवणार नाही.

रोहित शर्मा त्याचा पासपोर्ट, लग्नाची अंगठी, त्याची बॅग अशा अनेक गोष्टी विसरला आहे. इतकंच काय तर रोहित नाणेफेकीच्या वेळी त्याच्या खिशात नाण आहे हेही विसरला होता. त्याचबरोबर नाणेफेक जिंकल्यानंतर कोणता निर्णय घ्यायचा, हेही रोहित शर्मा मैदानावर विसरल्याचं पाहायला मिळालं होतं.