Tilak Varma Share Rohit Sharma Funny story Video: मुंबईचा राजा रोहित शर्मा त्याची फलंदाजी, नेतृत्त्व, त्याचा मनमोकळा बिनधास्त स्वभाव यासाठी ओळखला जातो. पण रोहितची अजून एक ओळख म्हणजे त्याचा विसरभोळेपणा. रोहित शर्मा अनेक गोष्टी विसरतो, ज्याचे बरेचसे किस्से आपण ऐकले आहेत. मोबाईल, पासपोर्ट, अंगठी आणि बरंच काही… आता तिलक वर्माने रोहित शर्माच्या विसरभोळेपणाचा अजून एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ऐकल्यावर रोहितने दिलेलं उत्तर व्हायरल होतंय.

रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतर मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी उतरला आणि ८४ धावांची खेळी करत दणक्यात पुनरागमन केलं. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यात रोहित शर्मा फिटनेस मिळवल्यानंतर खेळण्यासाठी उतरला आणि रायन रिकल्टनसह विजयाचा हिरो ठरला. रोहित शर्मा व रायन रिकल्टन यांनी १४३ धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयाचा पाया रचला. यानंतर एका कार्यक्रमात मुंबईच्या संघातील काही निवडक खेळाडू पोहोचले होते. या कार्यक्रमातील व्हीडिओ व्हायरल होत आहे.

“अरे यार मी फोन घरी विसरलो”; तिलकने पोलखोल करताच हशा पिकला

मुंबई इंडियन्सचा संघ लखनौविरूद्ध सामन्यापूर्वी मोठा ब्रेकमध्ये जामनगरला गेले होते, जिथे संघाने एकत्र वेळ घालवला. त्यादरम्यानचा रोहितच्या विसरभोळेपणाचा किस्सा तिलकने सांगितला आहे. तिलक म्हणाला, “आम्ही जेव्हा जामनगरला गेलो होतो, तेव्हा मी रोहित भाईला कॉल करत होतो आणि कोणी कॉल उचलत नव्हतं. मग भेटल्यावर मी त्यांना विचारलं, मी तुम्हाला कॉल करत होतो. तेव्हा रोहित भाई म्हणाले, अरे यार मी तर फोन घरी विसरलो रे.”

तिलकने रोहितचा हा किस्सा सांगताच सगळेच जण हसू लागले. त्यानंतर रोहितने माईक उचलला आणि म्हणाला, “मी तर मान्य करतो की मी गोष्टी विसरतो. त्यात काय एवढं, हे सगळे लोक जे इथे बसून हसत आहेत ना हे सगळे काही ना काही विसरतात…” रोहितने एकदम राजा अंदाजात दिलेलं हे उत्तर ऐकून सगळ्यांनी एकच जल्लोष केला.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघात परतल्याने मुंबईचा संघ अधिक मजबूत झाला आहे. पण सातत्याने सामने गमावल्याने आता मुंबईसमोर चूक करण्याची एकही संधी नाहीये. मुंबई इंडियन्सला आता प्लेऑफ गाठायचं असेल तर उर्वरित सामन्यांमधील सर्व चारही सामने जिंकावे लागणार आहेत. याशिवाय संघाच्या बाजूने इतर संघांचे निकाल लागणंदेखील आवश्यक असणार आहे. मुंबईचे पुढील सामने आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांविरूद्ध होणार आहेत.