रोहित शर्माचे चाहते जगभर पसरले आहेत. हिटमॅनच्या फटकेबाजीची भुरळ प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना पडते याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात पाहायला मिळाला. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यादरम्यान रोहित भारतासाठी शेवटचा सामना खेळणार या चर्चांना उधाण आलं. दौऱ्यातील शेवटच्या वनडेत अर्थात क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर रोहितने खणखणीत शतकी खेळी साकारली. या सामन्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार जोस बटलरने रोहितकडे जर्सीसाठी विनंती केली.
रोहितने विनंती तात्काळ मान्य करत स्वाक्षरी असलेली जर्सी जोसला भेट म्हणून दिली. रोहितने त्या जर्सीवर जोससाठी खास संदेशही लिहिला. ‘प्रिय मित्र जोस, तुझ्याबरोबर आणि तुझ्याविरुद्ध खेळणं नेहमीच आनंददायी असतं’, असं लिहत रोहितने ४५ नंबरची जर्सी भेट दिली.
जोसने रोहितविषयी भावना व्यक्त केल्या होत्या. ‘रोहित शर्माची जर्सी मला हवीच होती. मला आवडणाऱ्या सार्वकालीन महान खेळाडूंपैकी तो एक आहे. ही जर्सी खास ठेवा आहे, जपून ठेवेन. धन्यवाद’.
जोस बटलरने रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएल पदार्पण केलं होतं. २०१७ मध्ये मुंबईने आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरलं तेव्हा जोस मुंबई संघाचा अविभाज्य भाग होता.
लॉर्ड्सवरच्या शतकासह या ऐतिहासिक मैदानावर वनडेत शतकी खेळी साकारणारा रोहित पहिला भारतीय ठरला होता. पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिका आणि झिमाब्ब्वेत वनडे वर्ल्डकप होणार आहे. रोहित आणि विराट कोहली हे अनुभवी शिलेदार वर्ल्डकपचा भाग असणार का याविषयी सातत्याने चर्चा होते. इंग्लंड दौऱ्यादरम्यान निवडसमितीने रोहितला वर्ल्डकप योजनांचा तू भाग असणार नाहीस अशी कल्पना दिल्याच्या बातम्या समोर आल्या. यामुळे लॉर्ड्स वनडे रोहितचा भारतासाठी शेवटचा सामना ठरला असता. मात्र त्याआधी बीसीसीआय सचिव देवजीत साइकिया यांनी लॉर्ड्स वनडे रोहितची शेवटची असणार नाही हे स्पष्ट केलं. लॉर्ड्स वनडेनंतर बोलताना रोहित म्हणाला की, पदार्पण केल्यापासून लोक काहीतरी बोलतच आहेत. आताही तेच सुरू आहे. मी माझं काम म्हणजे बॅटिंग करतो.
