Rohit Sharma Viral Video: भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुजरातमधील जामनगर येथे गेला होता. दरम्यान तो जामनगरहून मुंबईत परतला आहे. मुंबईत परतल्यानंतर त्याचे विमानतळावरील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. रोहित आल्यानंतर, त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच गर्दी करतात. यावेळीही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. रोहित येताच चाहत्यांनी त्याच्या कारला घेरलं. यादरम्यान सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात एका चाहत्याने असं काही केलं, जे पाहून रोहितला संतापला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विमानतळावरून बाहेर आल्यानंतर रोहित आपल्या पत्नी आणि मुलांसह कारमधून जात आहे. यादरम्यान रोहितने कारच्या खिडकीची काच खाली केली आणि हात बाहेर काढून चाहत्यांना गुडबाय केलं. यादरम्यान २ तरूणांनी रोहितचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. हात पकडल्यानंतर दोघांनी रोहितसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच रोहितने लगेचच हात आत घेतला आणि काच वर केली. त्या दोन्ही युवकांचं वागणूक पाहून रोहित प्रचंड संतापला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रोहित शर्माला सध्या दिर्घकाळ विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे तो कुटुंबासोबत वेळ घालवाताना दिसून येत आहे. येत्या ११ जानेवारीपासून भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. रोहित या मालिकेत भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तो विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

मुंबईकडून खेळताना त्याने पहिल्याच सामन्यात दमदार शतकी खेळी केली होती. सिक्किमविरूद्ध खेळताना त्याने १५५ धावांची खेळी केली होती. त्यानंतर उत्तराखंड संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात तो गोल्डन डकवर बाद झाला होता. भारतीय संघाचा पहिला सामना बडोद्यात होणार आहे. या सामन्याआधी ६ जानेवारीला भारतीय खेळाडू एकत्र येणार आहेत.

रोहित शर्माची दमदार कामगिरी

रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृ्त्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. २०२५ मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. यासह त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने पहिल्यांदाच आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कब्जा केला. रोहितने २०२५ मध्ये फलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० धावा करण्याचा पल्ला देखील गाठला. रोहितला २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळायचा आहे. त्यामुळे यावर्षीही फॉर्ममध्ये सातत्य ठेवणं गरजेचं असणार आहे.